कल्याण – कल्याण लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांंना तुल्यबळ लढत देण्यासाठी ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाने तुल्यबळ उमेदवार दिला तर, त्या उमेदवाराच्या मागे सक्तवसुली संचलनालय (ईडी) किंवा तत्सम तपास यंत्रणांंचा चौकशीचा ससेमिरा लावला जाण्याची भीती असल्याने ठाकरे गटातील काही मातब्बर इच्छुक उमेदवारांंनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र, राज्यातील सत्ता ताब्यात असल्याने भाजप, शिवसेना आपल्या सोयीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग, आर्थिक गुन्हे विभाग यांचा वापर करते. भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भाजपचे खासदार केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच, सत्ताधारांच्या इशाऱ्याने गेल्या आठवड्यात बाळ्या मामा यांच्या भिवंडीतील कार्पोरेट गोदामांंवर एमएमआरडीएने कारवाई करून यापुढे तुम्हाला मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा सूचक इशारा दिला.

हेही वाचा – ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत

गेल्या वर्षी नोव्हेंंबर, डिसेंंबर कालावधीत केंद्रीय मंत्री कपील पाटील यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या माध्यमातून आव्हान देण्याची भाषा करणारे आणि या मतदारसंघातील अपक्ष इच्छुक उमेदवार जिजाऊ संघटनेचे नीलेश सांबरे यांना त्यांच्या रस्ते बांधकाम ठेकेदारीतील काही प्रकरणे बाहेर काढून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे प्रकार राज्य शासनाने केले. त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. त्यांच्या रस्ते कामांची चौकशी लावण्यात आली. हे सगळे धोके समोर असल्याने आपणासही अशाच एखाद्या प्रकरणात नाहक गोवून त्रास दिला जाण्याची भीती ठाकरे गटातील कल्याण लोकसभा मतदारसंघात इच्छुक पदाधिकारी, नेत्यांंमध्ये होती. त्यामुळे त्यांनी इच्छा असूनही मातोश्रीकडे आपणास उमेदवारी मिळावी म्हणून तगादा लावला नसल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंंतर कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी ठाकरे गटाबरोबर राहणे पसंंत केले. भोईर यांनी शिंदे गटात दाखल व्हावे म्हणून त्यांंना शिंदे गटाकडून विविध प्रकारचा त्रास देण्यात आला. भोईर हे दिवा, मुंब्रा भागातील मूळ निवासी आहेत. या भागातील त्यांची जुनी बांधकाम प्रकरणे बाहेर काढण्याच्या धमक्या शिंदे समर्थकांकडून देण्यात आल्याची चर्चा आहे. हेतुपुरस्सर त्रास दिला जाण्याच्या विचाराने भोईर यांनी यापूर्वी शांत राहणे पसंत केले होते. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ हे विद्युत ठेकेदार आहेत. त्यांनाही अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला. ठाकरे समर्थक अनेक व्यावसायिक, ठेकेदाराची शिंदे गटाने अनेक प्रकारे कोंडी केली. या कोंडीने त्रस्त आणि आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने यापूर्वी अनेक ठाकरे समर्थकांनी शिंदे गटात प्रवेश करून आपली कामे सुरळीत करून घेण्यात धन्यता मानली.

हेही वाचा – कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती

कल्याण लोकसभेसाठी खासदार शिंदे यांच्या विरुद्ध लढणाऱ्या ठाकरे गटातील पुरुष उमेदवाराची अनेक जुनी पुराणी प्रकरणे बाहेर काढून त्याला प्रचारापेक्षा अशा चौकशीच्या फेऱ्यात अडकून ठेवण्याची शिंदे गटाची जुनी निती आहे. त्यामुळे उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल पण तपास यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा पाठीमागे नको, कुटुंबियांना मनस्ताप नको म्हणून ठाकरे गटातील कल्याण लोकसभेचे प्रबळ दावेदार असलेल्या काहींनी उमेदवारीपासून दूर राहणे पसंत केल्याचे समजते. या विचारात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांचे नाव जाहीर केल्याचे समजते. आमदार गणपत गायकवाड प्रकरणातही ते बाहेर येणार नाहीत अशी व्यवस्था शिंदे गटाने केली असल्याची चर्चा आहे. यामुळे कल्याण, डोंबिवली शिवसेना, भाजपमध्ये धुसफूस आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Withdrawal of male candidates of thackeray group to avoid the scourge of ed in kalyan lok sabha ssb
First published on: 09-04-2024 at 14:52 IST