महिला प्रवाशांची मागणी; सुविधेबाबत समाधान
सकाळच्या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून महिलांना प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल महिला प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. या सुविधेबरोबरच कर्जत, कसारा, कल्याण, ठाणे या रेल्वे स्थानकांमध्ये ज्या फलाटांवर पुणे, नाशिककडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा थांबतील, त्या ठिकाणी पोलीस तैनात ठेवणे आवश्यक आहे, अशी मते उपनगरीय रेल्वेने मुंबईकडे प्रवास करणाऱ्या महिलांनी व्यक्त केली आहेत.
सकाळी सहा ते सात या वेळेत महिला प्रवाशांना पुणे, नाशिककडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून, मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या महिलांना रेल्वेने प्रवासाची मुभा दिली आहे. प्रवासासाठी दिलेली वेळ अगदी सकाळची आहे. या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांची संख्या मोजकीच आहे. तरीही अनेक महिला गर्दीमधील घुसमट टाळण्यासाठी सकाळच्या वेळेतही प्रवास करतील, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या उपाध्यक्ष लता अरगडे यांनी सांगितले.
लांब पल्ल्याच्या गाडय़ा कर्जत, कसारा, कल्याण, ठाणे रेल्वे स्थानकांवर थांबल्यानंतर उतरणाऱ्या प्रवाशांची घाई असते. लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे दरवाजे लहान असतात, अशा वेळी गाडीतून उतरणाऱ्या एखाद्या पुरुष प्रवाशाकडून एखाद्या महिलेला धक्काबुक्की झाली, अत्याचाराचा प्रसंग झाला, तर ती जबाबदारी कोणाची, हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होणार आहे. कोणतीही चुकीची घटना घडण्यापूर्वी कल्याण, ठाणे रेल्वे स्थानकांवर ज्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून महिला मुंबईच्या दिशेने प्रवास करणार आहेत, त्या फलाटांवर रेल्वे पोलीस, सुरक्षा दलाचे जवान तैनात असणे आवश्यक आहे, अशी मते महिला प्रवाशांनी व्यक्त केली.
एकदम सकाळच्या वेळेतील प्रवास सुखकारक आहे का, या विषयावर काही रेल्वे महिला प्रवाशांशी संपर्क साधल्यावर त्यांनी, कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरातील मुंबईच्या दिशेने नोकरीसाठी जाणारा चाकरमानी हा सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळेत प्रवास करतो. लोकल प्रवासाची ही सर्वाधिक गर्दीची वेळ आहे. या वेळेत मुंबईकडे जाणारी एकही लांब पल्ल्याची गाडी नाही. या वेळेत एक ते दोन लांब पल्ल्याच्या गाडय़ा उपलब्ध असत्या तर खरोखरच लोकलमधील महिला डब्यांमधील गर्दीचा भार कमी झाला असता. महिलांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी अनेक पुरुष प्रवासी मुंबई ते कसारा, कर्जत रेल्वे पास काढून लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून नियमित प्रवास करतात. या प्रवाशांना सकाळच्या वेळेत लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून मुंबईच्या दिशेने प्रवासाची मुभा दिली तर गाडीत चढणारे आणि कुटुंबासह उतरणारे प्रवासी यांच्यात दररोज तुंबळ हाणामारी होण्याची भीती आहे. याचा विचार रेल्वे प्रशासनाने प्राधान्याने करावा, अशा सूचना काही महिला प्रवाशांनी केल्या.

गर्दीच्या वेळेत मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांची संख्या कमी आहे. अशाही परिस्थितीत रेल्वे प्रशासनाने महिलांसाठी या गाडय़ांमधून प्रवास करण्याची परवानगी दिली, त्याबद्दल आभार मानले पाहिजेत. ही सुविधा देताना येणारे संभाव्य धोके ओळखून रेल्वेने सकाळच्या वेळेत ज्या फलाटांवर लांब पल्ल्याची गाडी थांबणार आहे; तेथे रेल्वे पोलीस तैनात करणे आवश्यक आहे. लवकरच शासनाचे अधिकारी, रेल्वेचे वरिष्ठ यांची रेल्वे प्रवासी संघटनांबरोबर बैठक होणार आहे. त्या वेळी कल्याण, डोंबिवली, बदलापूर शहरांच्या बाहेरील क्षेत्रात मेट्रो रेल्वेचा शासनाने विचार करावा. ठाणे, मुंबई, भिवंडी, नवी मुंबई विभागाशी कल्याण परिसर मेट्रोने जोडल्यास गर्दीचा भार कमी होईल. यासाठी शासनाने हालचाली कराव्यात, अशी सूचना करण्यात येणार आहे.
– लता अरगडे, उपाध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ