ठाणे : घोडबंदर येथील चितळसर मानपाडा भागात दुचाकीवर आलेल्या दोघांनी मोटारीने जाणाऱ्या महिला आणि तिच्या पतीला जबरदस्तीने अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या मोटारीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाले आहे. शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.
घोडबंदर येथील कासारवडवलीच्या दिशेने महिला तिच्या पतीसोबत मोटारीने जात होती. त्यावेळी तिच्या पतीची दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांसोबत बाचाबाची झाली होती. त्यामुळे दुचाकीवरील दोघांपैकी एकजण खाली उतरला. त्याने त्यांच्या मोटारीच्या खिडकीच्या काचेवर जोर-जोरात हाताने मारून काच फोडण्याचा प्रयत्न केला. तसेच मोटारीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार महिला आणि तिच्या पतीने मोबाईल चित्रीकरणाद्वारे कैद केला. याबाबत चितळसर पोलिसांना विचारले असता, हा प्रकार रविवारी रात्री चितळसर मानपाडा येथील उड्डाणपूलाजवळ झाला आहे. महिलेच्या पतीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद दाखल झाली असे चितळसर पोलिसांनी सांगितले. परंतु याप्रकारामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.