पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : मराठी नूतन वर्षांनिमित्त ठाण्यातील कौपीनेश्वर न्यासतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेत यंदा तीन ते चार नव्या उपयात्रांची भर पडणार आहे.

करोना पूर्व काळात स्वागत यात्रेच्या दिवशी घोडबंदर आणि कळवा भागातून उपयात्रा काढण्यात येत होती. यंदा करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे मुख्य यात्रेसह शहरातील कळवा, लोकमान्य नगर, वसंत विहार, ब्रह्मांड, घोडबंदर आणि लोढा या भागातूनही उपयात्रा निघणार आहेत. ठाणे शहरात प्रथमच मुख्य यात्रेसह मोठय़ा प्रमाणात उपयात्रांचा जोर पहायला मिळणार आहे.     

करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा शहरात मराठी नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे. यंदाच्या वर्षी शहरातील विविध संस्थांनी, गृहसंकुलांनी स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मराठी नववर्षांचे स्वागत शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने करावे यासाठी मुख्य यात्रेसह उपयात्रा काढण्यात येतात. जेणेकरून वेगवेगळय़ा भागातून एकत्र येण्यापेक्षा त्या त्या भागातील नागरिकांनी एकत्र येऊन मराठी नववर्षांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत आणि यात्रेच्या माध्यमातून सामाजिक – सांस्कृतिक संदेश नागरिकांना द्यावा हा यामागचा मूळ उद्देश असल्याची माहिती न्यासतर्फे देण्यात आली.

संस्थांचा सहभाग वाढला

करोना प्रादुर्भावामुळे गेले दोन वर्ष मराठी नववर्ष स्वागत यात्रा होऊ शकली नव्हती. मात्र, यंदा करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यात्रा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. आतापर्यंत न्यासकडे ३५ ते ४० संस्थांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. महिला सक्षमीकरण, देहदान, सायकल विषयक जागृती अशा विषय घेऊन संस्था स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत. यंदाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर असल्यामुळे संस्थांचाही उत्साह वाढला असल्याची माहिती श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या कार्यवाह अश्विनी बापट यांनी दिली.