मूल्य, तत्त्वे जोपासत तरुणांनी करियर घडवावे!; विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवींद्र शिसवे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला | Young people career cultivating values principles Special Inspector General Police advice students ysh 95 | Loksatta

मूल्य, तत्त्वे जोपासत तरुणांनी करियर घडवावे!; विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवींद्र शिसवे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना अनेक प्रलोभने येतात. ती टाळून तरुण पिढीने मूल्य आणि तत्त्वे जोपासत काम करावे.

मूल्य, तत्त्वे जोपासत तरुणांनी करियर घडवावे!; विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवींद्र शिसवे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

ठाणे : प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना अनेक प्रलोभने येतात. ती टाळून तरुण पिढीने मूल्य आणि तत्त्वे जोपासत काम करावे. या सेवेकडे केवळ प्रसिद्धी आणि चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी नोकरी म्हणून पाहू नये. सत्याची कास धरत देशसेवेलाच प्राधान्य द्यावे, असा मौलिक सल्ला विशेष पोलीस महानिरीक्षक (महाराष्ट्र राज्य मानवी आयोग, मुंबई) डॉ. रवींद्र शिसवे यांनी विद्यार्थ्यांना दिला. ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करियरविषयी कार्यशाळेत ते बोलत होते.

कार्यक्रमात गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटचे डॉ. केयूकुमार नायक, तासगावकर महाविद्यालयाच्या रुपाली तासगावकर, विद्यालंकार इन्स्टिटय़ूटचे हितेश मोघे, आयटीएम महाविद्यालयाच्या मीनल राणे आणि पूर्वा तावडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित या कार्यशाळेला विद्यार्थ्यांसह पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

स्पर्धा परीक्षांद्वारे करियरच्या अनेक संधी उपलब्ध होतात. मात्र कोणतेही क्षेत्र हे श्रेष्ठ वा कनिष्ठ नसते. समाजाच्या जडणघडणीत पत्रकार, डॉक्टर, अभियंता, पोलीस, प्रशासक, साहित्यिक यांसारख्या विविध क्षेत्रांत काम करणारे नागरिक मोलाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीदेखील कोणत्याही क्षेत्राची परस्पर तुलना करू नये. तसेच तरुणांनी आपले निश्चित ध्येय गाठण्यासाठी केवळ मोठी स्वप्ने न पाहता त्यासाठी चिकाटीने मेहनत घेणे गरजेचे आहे. ध्येय गाठताना अडचणी आल्यास खचून जाण्याऐवजी त्यातून मार्ग काढावा, अशी सूनचा डॉ. शिसवे यांनी केली.

स्पर्धा परीक्षांचे विश्व..

पाच सत्रांतील या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ करियर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत यांनी विद्यार्थ्यांना ‘स्पर्धा परीक्षांचे विश्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांमध्ये सुमारे ६४ प्रकारच्या विविध प्रवर्गातील परीक्षा असतात. या सर्व परीक्षा देण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविण्यासाठी दहावीपासूनच अभ्यासाची तयारी करावी. सामान्य ज्ञान वाढविण्याबरोबरच लेखनवेग वाढविणे, वाचनात सातत्य ठेवणे, चौकसपणा बाळगणे, संगणकीय ज्ञानावर भर देणे यांसारख्या गोष्टी विद्यार्थ्यांनी करायला हव्यात. तसेच पदवी शिक्षणादरम्यान कौशल्य विकास वाढविण्यावर भर देण्याचा सल्ला डॉ. गीत यांनी विद्यार्थ्यांना दिला.

समाजमाध्यमातील संधी.. 

पुढील सत्रात मराठी सोशल मीडिया संमेलनाचे सहसंस्थापक आणि समाजमाध्यमाच्या विश्वातील उद्योजक, अभ्यासक समीर आठल्ये यांनी ‘समाजमाध्यमांतील संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. समाजमाध्यमांमुळे करियरच्या असंख्य अशा संधी निर्माण झाल्या आहेत. त्यांचा बारकाईने अभ्यास करून आणि त्याचे गांभीर्य समजून घेऊन त्यातील संधींचा शोध घ्यावा. आपल्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांच्या तसेच विविध विषयांच्या विश्लेषणात्मक चित्रफिती समाजमाध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचविणे याद्वारे समाजमाध्यमातील प्रभावक (सोशल मीडिया इन्फ्लुन्सर) म्हणून काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. यात करिअर घडविण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. त्यामुळे कोणत्याही वयोगटातील व्यक्ती यात करिअर घडवू शकतात. तसेच या माध्यमांवर लिखाणाच्यादेखील अनेक संधी आहेत. मात्र या क्षेत्रात काम करण्यासाठी तरुणांनी दैनंदिन घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे असल्याचे आठल्ये आवर्जून सांगितले.

पुढील सत्रात ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी यांसारख्या अनेक शाखांतील दहावी, बारावीनंतरच्या संधींची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. आवडीच्या विषयात करिअर घडविले तर नक्कीच उत्तम यश मिळेल, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. त्याचबरोबर महाविद्यालयांची पूर्ण माहिती घेऊनच त्यात प्रवेश घेण्याचा सल्लादेखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

..तर उद्योजक होण्याचा मार्ग खुला

कार्यशाळेच्या अखेरच्या सत्रात जैवतंत्रज्ञान विषयातील तज्ज्ञ अभ्यासक, संशोधक डॉ. सिद्धिविनायक बर्वे यांनी जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील विविध संधींविषयी मार्गदर्शन केले. या क्षेत्रातील अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या महाविद्यालयांविषयीही माहिती दिली. तसेच हे शिक्षण घेऊन अनेकांना उद्योजक होण्याचे मार्गदेखील खुले होतात, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे डॉ. बर्वे यांनी लक्ष वेधले.

बौद्धिक वाढीसाठी खेळीमेळीचे वातावरण हवे : डॉ. हरीश शेट्टी

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेच्या एका सत्रात ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी विद्यार्थी आणि पालकांसमवेत संवाद साधला. दैनंदिन आयुष्यात तणावाचे नियोजन कसे करावे

याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच अभ्यासाबाबत अधिक भीती बाळगल्यास त्याचा परिणाम गुणांवर दिसून येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भीती टाळून योगासनांच्या साहाय्याने एकाग्रता वाढवावी. तसेच मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवावे. मुलांना अभ्यासाबरोबरच कौशल्यविकासात भर घालणाऱ्या इतर गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा सल्ला डॉ. शेट्टी यांनी पालकांना दिला.

‘बुद्धिमतेच्या जोरावरच ‘यूपीएससी’मध्ये यश’

योग्य वयात अंगीकारलेली मूल्ये, तत्त्वे, जिद्द ही प्रामाणिकपणे काम करण्यासाठी आयुष्यभर प्रेरणा देतात. त्यामुळे पालकांनीही मुलांना तत्त्वे जोपासण्याची शिकवण द्यावी. यूपीएससीसारखी स्पर्धा परीक्षा सर्वाना समान संधी देते. यामध्ये तुमच्या बुद्धिमतेच्या जोरावरच तुमची निवड होते, असे डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2022 at 00:55 IST
Next Story
ठाणे : अर्थपुरवठा करणाऱ्या बँकेचीच १ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक