भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाची हत्या; दोन जण जखमी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्न सोहळ्यात डीजेच्या तालावर नृत्य सुरू असतानाच वाद झाला आणि वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. नालासोपारा येथे रविवारी ही घटना घडली असून तुळींज पोलिसांनी पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातील तीन जणांना अटकही करण्यात आली आहे.

नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव येथील बजरंग नगरात रविवारी लग्न सोहळा होता. रात्री साडेअकराच्या सुमारास मंडपात डीजेच्या तालावर नृत्य सुरू होते. या वेळी बंटी ऊर्फ योगेश साविनकर हा तरुण नृत्य करताना अश्लील हावभाव करत होता. त्याला मनोज सुर्वे याने आक्षेप घेतला आणि तरुणांच्या या गटाला नृत्य करण्यापासून रोखले. त्या वेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. रात्री साडेअकराच्या सुमारास बंटी आपल्या साथीदारांना घेऊन तिथे आला आणि त्याने मनोजला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून तिथे असलेला विनय डिचवलकर (२१) हा मनोजला वाचवायला मध्ये पडला आणि त्याने हल्लेखोरांना रोखायचा प्रयत्न केला. त्या वेळी हल्लेखोरांनी विनयवर चाकूने वार केले. त्यानंतर दोन गटांत हाणामारी झाली. त्यात नरेश शर्मा आणि योगेश सानिवकर हे तरुण जखमी झाले.

नरेशवर नालासोपाऱ्याच्या अलायन्स रुग्णालयात तर योगेशवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तुळींज पोलिसांनी याप्रकरणी जखमी नरेश शर्मा आणि योगेश सानिवकर यांच्यासह पाच जणांवर हत्या, दंगल आदी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे, तर रुग्णालयात असलेल्या दोन आरोपींना नंतर अटक केली जाणार असल्याचे तुळींज पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात तणाव पसरला असून पोलिसांनी या भागात बंदोबस्त ठेवला आहे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth killed in wedding ceremony in nalasopara
First published on: 18-07-2017 at 02:21 IST