ठाणे : कोपरी येथे मैदाना उभी असलेली नऊ वाहने एका तरुणाने पेटवून दिल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. रविंद्र परिहार (३०) असे त्याचे नाव असून मित्राने दुचाकी चालविण्यास दिली नाही म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस येत आहे. याप्रकरणाचा सखोल तपास सुरु असल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली. या घटनेत पेटलेली सर्व वाहने ही दुचाकी प्रकारातील आहेत.
कोपरी येथील गांधीनगर भागातील एका मोकळ्या मैदानात येथील रहिवासी त्यांची वाहने उभी करतात. सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक वाहनांनी पेट घेतला. घटनेची माहिती कोपरी पोलीस, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी वाहनांना लागलेली आग नियंत्रणात आणली. परंतु वाहने जळून जवळपास खाक झाली होती. ही आग लावण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांमार्फत संशयित आरोपीचा शोध सुरु केला. त्यावेळी कोपरी येथे राहणाऱ्या रविंद्र परिहार याचे नाव उघड झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता, त्याने कृत्याची कबूली दिली. मित्राने दुचाकी चालविण्यासाठी दिली नसल्याने त्याने त्याची दुचाकी पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इतरही दुचाकी पेटल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड होत आहे. परंतु पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.
