News Flash

दर्शन कैलास मानसरोवराचे

कैलास पर्वताची आयुष्यात एकदा तरी यात्रा करण्याची इच्छा नसलेला हिंदू शोधूनही सापडणार नाही.

दर्शन कैलास मानसरोवराचे

कैलासावर कायम बर्फ असतो. परंतु इतर बाजूच्या पर्वतावर बर्फ नसतो हे विशेष. परिक्रमेचा तेथील डोंगर अतिशय कठीण व खडतर आहे. घोडय़ावरून जाणेही अत्यंत दिव्य ठरते.

कैलास पर्वताची आयुष्यात एकदा तरी यात्रा करण्याची इच्छा नसलेला हिंदू शोधूनही सापडणार नाही. महाभारतात सांगितल्याप्रमाणे खरोखर स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यात्रेला जाण्याची ओढ फार पूर्वीपासूनच होती. शेवटी एकदाचं जायचं पक्कं झालं. या यात्रेला ८-१० जणानी नोंद केली. खरे पायीच जाण्याचे भारत सरकारच्या यात्रा नोंदणी विभागातर्फे करण्याचे योजले होते, परंतु सर्व वरिष्ठ नागरिक असल्याने काठमांडूमार्गेच जाण्याचे ठरविले. आमच्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या झाल्यावर आम्हाला चिनी सरकारकडून जाण्याची परवानगी मिळाली. यात्रेला निघण्यापूर्वी सराव म्हणून डोंबिवली ते टिटवाळा, डोंबिवली ते शिळफाटा असा पायी चालण्याचा सराव एक ते दोन महिने सुरू केला. कैलास यात्रेत ऑक्सिजनची कमतरता, शारीरिक क्षमता व कैलास भेटीची असलेली आस यामुळे सराव चालू झाला.

२९ जुलै ते १३ ऑगस्ट २०१४ अशी तारीख आम्हाला दिली गेली, परंतु ती तिबेटी लोकांच्या स्थानिक यात्रेमुळे अगोदरच्या तीन बॅचेस रद्द केल्या. परंतु आमचा मार्ग सुकर होऊन २९ जुलै राजी आम्ही काठमांडू (नेपाळ) येथे एकत्र जमलो. सुप्रसिद्ध पशुपतिनाथाचे दर्शन घेतले. आमचा एकूण ५५ जणांचा ग्रुप होता. ग्रुपमध्ये मुख्यत्वेकरून महाराष्ट्र व कर्नाटक येथून आलेल्या पर्यटकांचा भरणा होता. आम्ही ३१ जुलै रोजी काठमांडूहून बसने प्रयाण केले.

नेपाळमधील एबीसी ग्रुपने आम्हाला नेण्याची व्यवस्था केली होती. त्याप्रमाणे दोन बसमधून व खाण्यापिण्याचा एक ट्रक तसेच सोबत ८-१० स्थानिक नेपाळी मदतनीस घेऊन प्रवासास आरंभ झाला. निघाल्यावर तासाभराने आम्हाला कळले की नेपाळमधील केदारी गावाजवळ प्रचंड पाऊस पडून, दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. तेथील स्थानिक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वाहतूक काही वेळा दोन दिवसांपर्यंतसुद्धा सुरू होत नाही. पण रस्ता एक ते दीड तासात मोकळा झाला व आमची यात्रा सुरू झाली. सुमारे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नेपाळ-चीन सीमेवर केदारी येथे पोहोचलो. केदारी सीमेवर सुमारे तासभर चिनी सैनिकांनी तपासणी केली. सीमा पार केल्यावर चिनी प्रदेशात प्रवेश केल्यावर आम्ही आमचे रुपये चिनी युआनमध्ये रूपांतरीत करून घेतले.

कोदागी सीमेवर आपल्याला नेपाळी बस सोडून चिनी बसमधून प्रवास करावा लागतो. प्रवासात दोन्ही बाजूला नितांत सुंदर हिरवळ, मोठे मोठे वृक्ष, मधूनच दऱ्या अशा निसर्गरम्य वातावरणात प्रवास चालला होता. रस्ता छोटा परंतु संपूर्णपणे डांबरी व सिमेंटचा होता. चिनी ड्रायव्हर सावकाश बस चालवीत होता. प्रवास सुखद होता.

आम्ही कोदरी गावात पोचल्यावर तेथे आणखी एक चेक पोस्ट असल्याने तेथे आवश्यक ते चिनी सरकारचे सोपस्कार पार पडले. चिनी तपासणी व भाषेच्या प्रश्नामुळे काहीही वाद घालू नये असे बजावल्यामुळे शांतपणे बसमध्ये बसून होतो. येथून दुपारी तीनच्या सुमारास न्यालम येथे मोठय़ा धर्मशाळेसारख्या जागेत आम्ही विसावलो. आजचा प्रवासाचा तिसरा दिवस असल्याने तेथेच मुक्काम होता. तेथील दुसरे दिवशी जवळच एक टेकडी चढून जाण्याचा कार्यक्रम पार पडला. ऑक्सिजन कमी असल्याने जणू काही डोंगरच चढल्याचा अनुभव सर्वाना आला. पुढील प्रवासासाठी ज्यांच्याकडे काही वस्तूंची कमतरता होती त्याची खरेदी न्यालम येथून करावी लागली. कारण पुढे एवढे मोठे शहर व बाजार नाही. किमतीत घासाघीस करण्याची भारतीय सवय तेथे चांगलीच कामी आली. न्यातम या गावाहून पुढे निघालो व सागा येथे प्रवासी स्थानावर येऊन पोचलो.

सागा हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे १५ हजार फूट उंचीवर आहे. आता काही जणांना शारीरिक त्रास सुरू झाला. डोके दुखणे, उलटय़ा व धाप लागणे असे किरकोळ त्रास सुरू   झाले. म्हणून मग सागा येथे न थांबता पुढे डोंग्पा येथे गेलो. तेथे जवळच आता मानसरोवर आहे. पोचल्यावर प्रथम कैलास पर्वताचे विहंगम दृश्य व दर्शन झाले. फार गहिवरून आले. कारण आतापर्यंत धुक्याच्या पडद्याआड असलेला कैलास एकदम मोकळा झाला. ज्याच्यासाठी केला होता अट्टहास तो समोर पाहताच कित्येकांनी तेथेच साष्टांग नमस्कार घातला. नंतर मानसरोवराच्या काठावर काहींनी स्नान करून मनोभावे पूजा केली. मानसरोवराच्या पाण्यावर  रोहित पक्षी विहंगपणे फिरत होते. रात्री एक-दीड वाजता आम्ही पुष्कळसे लोक मानसरोवराच्या काठावर ऐन थंडीत चार पदरी गरम कपडे घालून कैलासावरून येणाऱ्या ताऱ्यांची प्रतीक्षा करीत बसलो होतो. अध्र्या एक तासाचा ताटकळल्यानंतर दोन तारे कैलासावरून निघून सावकाश मानसरोवराकडे झेपावले आणि पाण्यात आल्यावर अतिशय सुंदर असे नर्तन सुरू झाले. ही देवांच्या आंघोळीची वेळ असल्याने सर्व शिवगणही स्नानासाठी तेथे येतात, असे मानले जाते. हे सर्व विहंगम दृश्य पाहून डोळ्यांत साठविण्यासाठी मन आतुर झालेले होते. दुसऱ्या दिवशी ही सर्व गोष्ट झोपलेल्यांसाठी चांगलीच चुटपुट लावणारी ठरली.

मानसरोवरांवरून पुढे आम्ही दारचेमार्गे निघून तारबोचे म्हणून ठिकाणावर बसने पोचलो. तेथे यमद्वार आहे. म्हणजे सुमारे एकमजली दरवाजासारखी घुमटी आहे. आतून तीन वेळा प्रदक्षिणा घातल्यावर तुमचा स्वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा होतो, अशी आख्यायिका आहे. इथे प्राणवायूचे प्रमाण फारच कमी असल्याने दम तर फारच लागत होता.

यमद्वाराच्या पुढे घोडे किंवा पायी यात्रा सुरू होते. हिच प्रदक्षिणेची वाट आहे. तेथून आठ ते दहा किमीवर डेरापूक नावाचे ठिकाण आहे. प्रदक्षिणा किंवा परिक्रमा म्हणा तीन दिवसांची असते. आम्ही पायीच जाणे पसंत केले. कारण घोडा करणे म्हणजे भारतीय रुपयांमध्ये पंचवीस हजारांना फोडणी होती. काही जणांनी मात्र घोडय़ाचा पर्याय स्वीकारला.

डेरापूक हून जाताना कैलासाचे मधूनमधून दर्शन होते. कैलासाजवळ आपण एवढे जवळ जातो त्या वेळी लक्षात येते की कैलास तेथे असलेल्या पिवळ्या टेकडय़ावर पहाड ठेवल्याप्रमाणे दिसतो. रावणाने मांधाता पर्वतावरून कैलास आणला व लघुशंका झाल्यामुळे तेथे टेकडय़ावर ठेवला. परंतु तेथे ठेवल्यामुळे त्याला तो परत उचलता आला नाही, असे मानले जाते असे आमच्या वाटाडय़ाने सांगितले. तेथे एक राक्षसताल म्हणजे रावणतलाव आहे. या रावणतलावावर एकही जिवंत प्राणी, मासे किंवा पक्षाचे वास्तव्य नाही. तलावाचा रंगही वेगळा आहे. मजेची गोष्ट ही की डेरापूकला जाताना वाटेत कैलास एखाद्या गंभीर तपस्याप्रमाणे तपश्चर्येला बसल्याचा भास होतो. कैलासाच्या समोर एक टेकडी नंदीचे रूप घेतल्याप्रमाणे दिसते. कैलासावर वेगवेगळी रूपे दिसतात. गणपती, हत्ती असे आकार भासतात. एकदा तर ओमचा सुंदर आकार दिसून आला. आणि थकलेले शरीर व मन एकदम ताजेतवाने झाले. आज पौर्णिमा असल्याने कैलास चांदण्यात न्हाऊन निघाला होता. आठनंतर हळूहळू धुक्यात दिसेनासा झाला. निसर्गाची किमया अगाध आहे.

दुसऱ्या दिवशी डेरापूकहून नडोल्माला पास येथे जावयाचे होते. चढण एकदम उंच होती व ऑक्सिजनही पुरेसा नव्हता. आम्ही सिलेंडर्स घेतली होती. परंतु त्याची गरज भासली नाही. रस्त्यात प्रवासात झेंडेच झेंडे व पताका लावलेल्या दिसत होत्या. या ठिकाणाहूनच तिबेटी लोकांची कैलास यात्रा व प्रदक्षिणा सुरू होते. सर्व तिबेटीयन लोक अत्यंत भाविकतेने लहानापासून थोरापर्यंत पायीच प्रवास करतात. अष्टपाद पर्वत हे कैलासाच्या समोरील असलेल्या आठ पर्वतांना म्हणतात.  अष्टपाद म्हणजे जैन धर्मीयांचे पहिले र्तीथकर ऋषभदेव यांच्या महानिर्वाणाचे ठिकाण. ऋषभदेव यांना आठ पावलात मुक्ती मिळाली म्हणून हे ठिकाण पवित्र मानण्यात येते. हे अष्टपाद पर्वत कैलास पर्वताला लागूनच दक्षिणेकडे आहे. हे पर्वताचे ठिकाण सिद्धीचे ठिकाण असल्याने अनेक ऋषी, साधू व मुनी पायथ्याजवळच्या गुहेत वास्तव्य करतात.

कैलासावर कायम बर्फ असतो. परंतु इतर बाजूच्या पर्वतावर बर्फ नसतो हे विशेष. परिक्रमेचा तेथील डोंगर अतिशय कठीण व खडतर आहे. घोडय़ावरून जाणेही अत्यंत दिव्य ठरते. आमच्यातील एक मुंबईचे सहप्रवासी घोडय़ाच्या रिकिबीत पाय अडकून घोडय़ावरून पडले. घोडय़ाने त्यांना आठ दहा फूट तसेच फरफटत नेले. त्यांना श्वासही घेता येईना. परंतु आमच्या वाटाडय़ाने त्यांना भराभर प्राणवायू देऊन खाली सुरक्षित आणले व पुढचा बाका प्रसंग टळला.

डोल्माला पास ही पर्वतमाला मागे टाकल्यावर काही वेळ उतरण असल्याने पायीच चालणे इष्ट. वाटेत गौरी कुंड लागते. भाविक तीर्थ म्हणून पाणी भरून घेतात. गणपतीचा जन्म येथे झाला अशी आख्यायिका आहे. हे पाणी भरून देण्यासाठी शेरपा फारच पैसे घेतात. पुढे प्रवास चालू होतो व झुतुलपूक या ठिकाणी मुक्काम.

तिसऱ्या दिवशी परत पाच ते सहा कि. मी चालत आम्ही मूळ ठिकाणी आलो. चहा-नाश्ता तयारच होता. पहाटे अडीच वाजता निघायचे होते. परंतु पावसामुळे रस्ता खराब झाल्याने हेलिकॉप्टरचा प्रवास घडला. हेलिकॉप्टरमधून समजले की खराब हवामानामुळे गावांचे नामोनिशाणही शिल्लक राहिले नाही. या १५ ते २० मिनिटांच्या प्रवासाकरिता सुमारे सोळा हजार रुपये खर्च झाले.

मजल दरमजल करीत आमची परतीची बस परत काठमांडूला आली. दुसऱ्या दिवशीच्या विमानाने आम्ही मुंबईला परतलो. हिमालयाच्या सौंदर्याने नटलेला कैलास व मानसरोवर यात्रा डोळ्यासमोरून जात नव्हती.
उमेश महाडळदकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2016 1:04 am

Web Title: kailash mansarovar 2
Next Stories
1 सिंगापूरची सूरमयी सफर
2 केदारकंठवरील थरारक पदभ्रमण
3 अमेरिकानुभव
Just Now!
X