पावसाळी भटकंतीसाठी पालघरमधील वाडाजवळील कोहोजगड एक उत्तम स्थळ आहे. हिरवाईने नटलेले डोंगर, हिरवी शेते, खळाळणारे झरे-ओढे, भरलेली तळी या साऱ्यांत कोहोजगडची भटकंती वेगळय़ाच विश्वात घेऊन जाते.
पाऊस म्हणजे आकाशाने धरतीला पाठवलेलं प्रेम! ढगांच्या कुशीत साठवलेले प्रेम आकाशातून बरसू लागले, की हळूहळू धरती सजू लागते, बहरू लागते आणि आनंदाने भिजून जाते. शहरातला पाऊस हा पाऊस नाहीच मुळी. तो सिमेंटच्या रस्त्यावर पडतो, पण त्याला मातीचा सुगंध येत नाही. पक्षी-प्राण्यांचा आवाज तर सोडाच पण पावसामुळे होणाऱ्या तक्रारी जास्त! पावसाची खरी मजा निसर्गातच लुटता येते.
या पावसाचा, निसर्गाचा आणि ट्रेकिंगचा आस्वाद घ्यायचे ठरले. पालघरमध्ये वाडा येथून काही अंतरावर बसने वाघोटा येथे ‘कोहोजगड’ आहे. ठाणे स्थानकापासून अडीच तासांत गडाजवळच्या रस्त्यावर आलो आणि मन एका क्षणात शिखरावर पोहोचले.
कोहोजगड चढण्यासाठी सोपा असला, तरी गावातील व्यक्ती सोबत घेऊन जा अशी आगाऊ सूचना मिळालेली होती. त्याप्रमाणे सिमेंटच्या
रस्त्याला दूर लोटत मातीच्या रस्त्यावरून चालण्यास सुरुवात केली. हिरवीगार शेते, त्याच्या बांधावरच्या वाटा सुरू झाल्या. पुढे बदामाच्या आकाराचा एक तलाव लागला लागला. त्याच्या काठाशीच गड उभा असूनही त्याचे प्रतििबब पाण्यात दिसत नव्हते. तलावाकाठी अनेक लहान-मोठी मुले मासे पकडण्यासाठी गळ टाकून बसलेली. तलावासभोवातालचा परिसर गोल्फच्या मदानाप्रमाणे उंचसखल पण हिरवागार दिसत होता. तलावापुढचा हा हिरवाईचा भाग ओलांडल्यावर जंगलातील झाडा-झुडपांमधील वाट सुरू झाली आणि चालण्याची शैली वारंवार बदलू लागली. वळून पाहिल्यास जास्तीत जास्त दूरचा प्रदेश दिसू लागला. वाट जंगलातूनच जात असल्याने वातावरणात गारवा होता. उन्हाळ्यात रुक्ष वाटणारे वृक्ष आता पावसाळ्यात बहरून गेले होते. आता काही दिवसांपूर्वीचे उन्हाळय़ातील चटक्यांचे दु:ख ते किती सहज विसरले होते. निसर्गाची हीच शिकवण घेत वाट काढू लागलो. गडाच्या एका टप्प्यावर नाना प्रकारची फुलपाखरे समोर आली. फुले संख्येने फारच कमी तरीही ही फुलपाखरे दिसत होती!
नवख्या ट्रेकर्ससाठी हा गड फारच उत्तम वाटला. थोडय़ा थोडय़ा उंचीवर चढल्यानंतर आराम करण्यासाठी किंवा टेकण्यासाठी साधा दगडही वारंवार साथ देतो. गड उजव्या बाजूला ठेवून मार्गक्रमण करताना एका टप्प्यावर गडाचा सर्वात अरुंद भाग दिसतो. इथून चढाई करण्याच्या प्रयत्नात एकाला मृत्यू कसा ओढवला आणि मृतदेह कसा काढला हे बरोबरच्या गावकऱ्याने सांगितले. त्याचे इथे स्मारकही आहे. इथून पुढे माथ्यावर जाण्याचा रस्ता आणखी आनंददायी आहे. वाटेत लागणारी तळी आपल्याला लहान बनवून पाण्यात खेळायला भाग पाडतात. मोकळ्या मदानात मध्यावर एक सुंदर शिवमंदिर असून समोर नंदी आहे. काही अंतरावर झाडाखाली काही शेंदराने रंगवलेल्या मूर्ती दिसतात. या मंदिराजवळील दोन टाक्या अस्वच्छ पाण्याने भरलेल्या आहेत. मंदिरामागील झाडावर चढून आपल्यातल्या लहान मुलाचे हट्ट पुरवता येतात. मागून वाहणारा झरा, पलीकडे डोंगराच्या कडय़ावरून दिसणारे सृष्टिसौंदर्य हे सारे खूपच रमणीय आहे.
इथूनच गडमाथ्यावर दगडाचा एक उंच माणूस मिठी मारण्यासाठी हात पसरून बोलावत आहे असे वाटते. पुढे चढाई करताना उजवीकडे कातळात पाण्याची टाकी आहेत. त्यातील तिसऱ्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. अगदी थोडय़ा अंतरावर पायऱ्या चढून गेल्यावर डावीकडे बुरूज दिसतो. बुरुजावरच एक छोटेसे मंदिर आहे.
मंदिरासमोरील वाटेने दगडी माणसाकडे पोहोचता येते. ‘फार जवळ गेल्यानंतर माणसातला फक्त दगडच दिसतो’. त्याच्या आसपास उभे राहण्यासाठी फारशी जागा नसून पलीकडेही खोल दरीत जंगल आहे. थोडय़ा अंतरावर आणखी एक छोटेसे मंदिर आहे. दोन-अडीच तासांची आरामदायी चढाई करून शिखर गाठल्यानंतर रिमझिम पाऊस वेगाने शिखरावर पोहोचला आणि दिवसभर दडी मारलेल्या पावसाची कमी भरून निघाली. शिवाय गडावरील तळ्यांमध्ये पाण्यासोबत आनंदही वाहू लागला. उतरताना पाऊस आधीच उतरून गेला होता. यामुळे परतीचा मार्ग चिखलाने माखला होता. चढताना वाट दाखवणाऱ्याची गरज वाटली नाही; पण उतरताना त्याचीच मदत घेत उतरलो. पूर्ण उतरून झाल्यानंतर पुन्हा पाऊस वेगाने आला आणि निरोप देऊन निघून गेला.
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2014 रोजी प्रकाशित
सहजसुंदर कोहोजगड
पावसाळी भटकंतीसाठी पालघरमधील वाडाजवळील कोहोजगड एक उत्तम स्थळ आहे. हिरवाईने नटलेले डोंगर, हिरवी शेते, खळाळणारे झरे-ओढे, भरलेली तळी या साऱ्यांत कोहोजगडची भटकंती वेगळय़ाच विश्वात घेऊन जाते.
First published on: 13-08-2014 at 06:34 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beautiful kohoj gad