ढवळय़ा अथवा चंद्रगड हा जावळीच्या कोंदणातील अजून एक हिरा. उन्हाचा त्रास वाचवण्यासाठी जंगलात लपलेल्या या किल्ल्यावर सकाळी लवकरच ताज्या दमानेच चढाई सुरू केली. त्या थंडीतही गड घाम काढत होता. अंगावर येणारा छाती दडपवणारा चढ, झाडांच्या गर्दीत हरवून गेला होता. जंगलात ठिकठिकाणी लावलेल्या ‘ॐ नम: शिवाय’ पाटय़ा रस्ता चुकलो नसल्याची जाणीव करून देत राहतात. अध्र्या-पाऊण तासानंतर म्हसोबाच्या िखडीतून गडाची खडी चढण सुरू होते. कारवीच्या झाडीतून घसाऱ्याची वाट पकडायची आणि पाऊण तासात गडाचा कातळटप्पा गाठायचा. दमून दोन क्षण उभे राहून अजून किती चढायचे आहे ते पाहण्यासाठी वर पाहिले तर साक्षात सूर्यनारायण चंद्रगडाच्या पाठीमागून आमच्याकडे डोकावून पाहात होते.
कदाचित सूर्य बघायला आला असेल, की एवढय़ा पहाटे कोणाला हुक्की आली जावळीमध्ये घुसायची? सूर्योदयाचे ते अप्रतिम दृश्य कॅमेऱ्यापेक्षा डोळय़ांमध्ये आयुष्यभरासाठी बंदिस्त झाले. पुरुषभर उंचीच्या या कातळातील पायटय़ांवरून अतिशय काळजीपूर्वक चढून माथ्यावर जायचे. वर जाताच खोऱ्यातून वर येणारा भन्नाट वारा आपले स्वागत करतो आणि मग जावळी खोऱ्याचे दिसणारे विहंगम दृश्य. महाबळेश्वराजवळचे आभाळाला गवसणी घालणारे सह्याद्रीचे अजस्र कडे आणि त्यातून अल्लडपणे वाहणारी ढवळी नदी. खाली दूरवर इवलीशी दिसणारी ढवळे गावातील घरे पाहिल्यावर सह्याद्रीच्या अवाढव्य आकाराची आणि आपल्या नगण्यपणाची जाणीव होते.चंद्रगडाचा विस्तार तसा छोटासाच आहे. चिंचोळय़ा गडमाथ्यावर एक सुंदर घडीव नंदी आणि समोर कातळात खोदून आत कोरलेली िपड दिसते. या ढवळेश्वराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीला पंचक्रोशीतून भाविक येतात. िपडीचे दर्शन घेऊन कातळात खोदलेल्या प्रवेशद्वारातून गडाच्या बालेकिल्लावजा सर्वोच्च माथ्यावर पोचायचे. येथे वाडय़ाचे काही अवशेष दिसतात. जवळच एक पाण्याचे टाके आहे. तर शेजारची पायवाट गडाच्या उत्तरेला असलेल्या टाक्याकडे घेऊन जाते. ही वाट कातळ आणि तटबंदीमधील एका लहानग्या दरवाजातून जाते. दरीला एकदम खेटून खोदलेल्या या टाक्याचे थंडगार पाणी पिण्यायोग्य आहे. तर शेजारच्या पहाऱ्याच्या गुहेपाशी बसून पाण्याचे दोन घोट घेताना इतिहासात रमायचे आणि समोरचा निसर्ग पाहून नि:शब्द व्हायचे.
रायरेश्वर, कोळेश्वरची पठारे, महादेवाचा मुऱ्हा, महाबळेश्वर, ढवळे घाट असा बराच मोठा प्रदेश दृष्टिक्षेपात येत असल्याने परिसरावर पहाऱ्यासाठी यापेक्षा उत्तम जागा दुसरी कोणती असेल. चंद्रराव मोऱ्यांनी ज्या जावळीच्या जोरावर महाराजांशी उद्धटपणा केला ती जावळी चंद्रगडावरून अनुभवता येते. जावळीचा निबिडपणा जाणवतो आणि मनात घोळत राहते ते चंद्रराव मोऱ्यांचे उत्तर ‘जावळीस येणार असाल तर यावे. दारू-गोळा मौजूद आहे. येता जावळी, जाता गोवळी!’
(ही संपूर्ण ब्लॉगपोस्ट पाहण्यासाठी खालील लिंक पाहावी http://amitshrikulkarni.in/posts/chandra-mangal)