साहसाच्या जगात गिर्यारोहण, गिरिभ्रमण, सायकलिंग, नौकानयन, पॅराजंपिंग या अशा खेळांबरोबरच उमद्या अश्वांच्या सोबतीने सुरू असलेला एक क्रीडाप्रकार म्हणजे अश्वारोहण! जातीचे घोडे आणि हाडाचे प्रशिक्षक या आधारे हा साहसी छंद जोपासता येतो. पण या दोन घटकांच्या पातळीवर अनेक ठिकाणी मर्यादा येत असल्याने या छंदाची पाळेमुळे आपल्याकडे फारशी रुजली-वाढली नाहीत. पण या साऱ्या आव्हानांवर मात करत घोडेस्वारीच्या प्रशिक्षणापासून ते डोंगरदऱ्यातील मोठय़ा मोहिमांपर्यंतची मजल पुण्याच्या ‘दिग्विजय प्रतिष्ठान’ने मारली आहे.
शिवकाळाचा शोध घेणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल  (निवृत्त) वाय. डी. सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली बारा वर्षांपूर्वी या साहसयात्रेला सुरुवात झाली. सुरुवातीला पुण्यात एका शिबिर स्थळावर एखाद-दुसऱ्या घोडय़ाच्या आधारे शास्त्रोक्त प्रशिक्षण, मग त्यांच्यातील विविध स्पर्धा; पुढे या प्रशिक्षित घोडेस्वारांच्या साहाय्याने विविध गडकोटांवरील मोहिमा याद्वारे संस्थेने अश्वारोहणाची ही वाट रूंद आणि वैविध्याने परिपूर्ण केली आहे.
अश्वारोहण हा खरेतर आगळा-वेगळा खेळ आहे. मुळात अश्व आणि माणूस यांचे सहचर्य कधी सुरू झाले हेही सांगणे अवघड आहे. पण अगदी ग्रीक, रोमन, िहदू इत्यादी पुराणकथांमध्ये घोडय़ाचा उल्लेख आपल्याला दिसतो. पुराणकाळापासून हा प्राणी मानवाचा सहकारी म्हणून दिसतो. राणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई या व्यक्तिमत्त्वांनी तर त्यांच्या घोडय़ांना सर्वोच्च स्थान दिले आहे.
मध्ययुगीन काळात दळणवळणाचे साधन व लढायांसाठी,
धंद्यासाठी घोडय़ांचा वापर हा मोठय़ा प्रमाणात होत होता. किंबहुना ज्याचे अश्वदल मोठे व भक्कम त्या राजाचे राज्य सर्वदूर असे. ज्याप्रमाणे सागरावर राज्य करायचे तर बोट, जहाजे हवीत, त्याप्रमाणे जमिनीवरील साम्राज्यासाठी अश्व दल महत्त्वाचे असे. अगदी अलिकडे दुसऱ्या महायुध्दापर्यंत लढायांमध्ये घोडय़ांचा वापर होत असे. तसेच अगदी अलिकडील काळात ग्रामीण भागात मोठय़ा शेतांवर फिरण्यासाठीसुध्दा घोडय़ाचा वापर केला जाई.
आधुनिक काळात दळणवळणाची साधने यांत्रिक झाली, युध्दाचे स्वरूप बदलले आणि यामुळे घोडय़ाचे महत्त्व काही प्रमाणात कमी झाले. पण घोडय़ाची उपयुक्तता, महत्त्व आणि आकर्षण कमी झाले नाही. यातूनच प्रत्यक्ष घोडदळ ठेवण्यापेक्षा त्याची जागा अश्वारोहणासारख्या क्रीडाप्रकारांनी घेतली.
इतिहासकाळापासून आपल्याकडे जरी अश्वारोहण सुरू असले तरी छंद आणि क्रीडा प्रकार म्हणून त्याचा विकास साधारण राष्ट्रीय छात्र सेना किंवा लष्करी प्रशिक्षणातून आपल्याकडे सुरू झाला आहे. पुढे आपल्याकडे व्यावसायिक आणि हौशी असे अश्वारोहणाचे दोन मार्ग तयार झाले. तरीही या छंदासाठी आवश्यक जातीचे घोडे आणि प्रशिक्षणासाठी लागणारे हाडाचे प्रशिक्षक यांची उणीव इथे कायम राहिली. यामुळे छंदाची पाळेमुळे आमच्याकडे फारशी रुजली-वाढली नाहीत. यातूनच मार्ग काढत  ‘दिग्विजय प्रतिष्ठान’ने गेल्या बारा वर्षांत मोठी घोडदौड मारली आहे.संस्थेतर्फे पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीत अश्वारोहण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचप्रमाणे पुण्याजवळील राणी लक्ष्मीबाई मुलींची सनिकी शाळा, गाईड इंग्लिश मीडियम स्कूल आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना अश्वारोहणाचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय गडचिरोली, रत्नागिरी, चंद्रपूर आदी ठिकाणच्या शाळांना अश्वारोहणासाठी संस्थेचे सातत्याने सहकार्यही सुरू असते. या शास्त्रोक्त प्रशिक्षणातून तयार झालेल्या घोडेस्वारांच्या स्पर्धा घेतल्या जातात, मग पुढे यातील निवडक घोडेस्वारांच्या विविध गडकोटांवर मोहिमा काढण्यात येतात.
आजवर अशा अनेक मोहिमा काढल्या आहेत. २००८ साली शिवनेरी ते रायगड या अश्वमोहिमेत ३ दिवसात १८ किल्ले आणि ७५० कि.मी. अंतर पार केले गेले. २०१० साली संस्थेतर्फे सागरी किल्ल्यांची अश्वमोहीम आखण्यात आली होती. यामध्ये संस्थेच्या अश्वरोहकांनी सागरी किल्ल्यांची ही साखळी घोडय़ांच्या टापांनी पुन्हा जोडली.
नाशिक येथे २००५ साली झालेल्या राष्ट्रीय शालेय अश्वारोहण स्पध्रेत संस्थेने २ सुवर्ण, ४ रौप्य व ३ कांस्य पदके मिळवली. त्याचप्रमाणे पुणे व इतर ठिकाणी झालेल्या अश्वारोहण स्पर्धामध्ये पदके मिळवून उल्लेखनीय यश मिळवले आहे. डी. ई. ए. व दिग्विजय प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या ३ राज्यस्तरीय स्पध्रेत मानाचा ले.जनरल वाय.डी.सहस्रबुध्दे चषक विद्यार्थ्यांनी सलग ३ वेळा मिळवला आहे.
या खेळाचा, स्पर्धाचा अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचावा, या खेळाचा प्रसार व्हावा या हेतूने संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. या खेळाच्या माहितीपर पुस्तिकांचे वाटप केले जाते. शाळा, महाविद्यालयात माहितीपटांचे मोफत प्रदर्शन घडवले जाते.
हा खेळ शरीर आणि मन या दोन्हींचाही विकास करणारा आहे. यातून व्यक्तिमत्त्वाचा खऱ्याअर्थाने विकास घडतो. आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आदी गुणांचा इथे विकास होतो.  शारीरिक क्षमतांचा विकास इथे होतो तर निर्णय क्षमतेची कसोटी लागते.
आपल्या कित्येक पटीने ताकदीने मोठय़ा असलेल्या या प्राण्याला आपण आपल्याला हवे त्याप्रमाणे चालवू शकतो, पळवू शकतो, नियंत्रित करू शकतो; यातून मिळणारा आत्मविश्वास आपल्याला इतर क्षेत्रातही उपयोगी पडतो. शारीरिक तंदुरूस्तीसाठी हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. जिद्द आणि धाडस यांचा हा खेळ आहे.
घोडय़ावर बसल्यावर त्याला चालवताना, पळवताना आपल्याला आपले हात, पाय आणि संपूर्ण शरीराचा वापर करावा लागतो. यातून पायाच्या बोटांपासून ते मानेपर्यंत सर्व शरीराला उत्तम व्यायाम होतो. अश्वारोहण करताना आपल्या पायांच्या वापरामुळे शरीरातील रक्ताभिसरणाचा वेग वाढतो, अशुध्द रक्त हृदयाकडे पाठवून शुध्द रक्ताचे प्रमाण वाढते आणि प्राणवायू मोठय़ा प्रमाणात मिळतो. शारीरिक तंदुरूस्ती बरोबरच या खेळामुळे मिळणारे मानसिक समाधानही मोठे असते.एखाद्या उमद्या घोडय़ावर स्वार झालेला साहसवीर पाहताना आपणा प्रत्येकालाच त्याचा हेवा वाटतो. अश्वारोहणाच्या या कृतीतून जणू त्या दोघांचेही सळसळते तारूण्य भवतालावर छाप पाडत असते. अशाच या आगळय़ा-वेगळय़ा साहसवाटेवर ‘दिग्विजय प्रतिष्ठान’ने गेल्या बारा वर्षांत मोठी घोडदौड मारली आहे.
गुणेश पुरंदरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिग्विजय प्रतिष्ठान आणि डी.ई.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी राज्यस्तरीय शालेय निमंत्रित अश्वारोहण स्पर्धा २५ व २६ डिसेंबर रोजी पुण्यात आंबेगाव येथील शिवसृष्टीत आयोजित केली आहे. यामध्ये शो-जंिपग, ड्रसाज, क्रॉसकंट्री, टेंटपेिगग आदी घोडेस्वारीचे विविध प्रकार सादर केले जाणार आहेत. या सर्वामध्ये नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, अकलूज, नगर, मुंबई, पुणे इ. ठिकाणचे संघ सहभागी होणार आहेत. नवोदित  खेळाडूंना या क्रीडा प्रकारांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. अधिक माहितीसाठी गुणेश पुरंदरे  ( ९८२२६२१०१६) यांच्याशी संपर्क साधावा.

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horse riding
First published on: 19-12-2013 at 10:46 IST