अलिबागसमोरील खोल समुद्रात खांदेरी उंदेरी जलदुर्ग आहेत. जाण्यायेण्याच्या गैरसोयी आणि बेटावरील वावराला असलेले र्निबध यामुळे हे दुर्ग पाहणे अनेकदा दुरापस्त असते. पण एखादी कोळय़ाची बोट ठरवत या बेटांवर निघालो, की या जलदुर्गाबरोबरच समुद्रातील हा प्रवासही लक्षणीय ठरतो.
अलिबागसमोरील खोल समुद्रात असलेली दूरवरची खांदेरी उंदेरी बेटे त्यावरील किल्ल्यांमुळे नेहमीच खुणावत असतात. पण हे किल्ले पाहायचा योग सहजी येत नसतो. कारण एकतर उंदेरी बेटावर कोणी जात नाही व खांदेरी बेट केंद्र सरकारच्या तटरक्षकाच्या अखत्यारीत असल्याने सामान्यजनांना ते दुरापस्त आहे. खांदेरी बेटासाठी मात्र एक पर्याय उपलब्ध आहे. तेथे मच्छीमार कोळी लोकांचे दैवत वेताळदेव असल्याने कोळी लोकांची या किल्ल्यावर ये-जा सुरू असते. त्यांच्यातील एखादी बोट ठरवत गडावर जाता येते. थळ गावातून आम्ही असेच एका रम्य उष:काळी पाच-पन्नास दर्यासारंगांच्या सोबतीने खांदेरीकडे निघालो.
समुद्रात डावीकडे दीपगृह असलेली उंच टेकडी म्हणजे खांदेरी व उजवीकडे किरकोळ उंचीचे छोटे बेट म्हणजे उंदेरी. अध्र्या तासात उंदेरीला वळसा घालून आमची बोट खांदेरीला टेकली व आम्हाला  उतरवून ती पुढे मच्छीमारीला निघून गेली. सुरुवातीलाच ‘कान्होजी आंग्रे द्वीप’ अशी मोठी पाटी दिसते. चढय़ा खडकावरून चढत पायी पाच-दहा मिनिटांत आपण पत्र्याच्या मोठय़ा शेडमधील श्री वेताळदेव मंदिरात येतो. लालजर्द शेंदूर फासलेला वेताळदेवाचा आतील भव्य तांदळा. रौद्र समुद्राला शोभणारा देव. तेथून चहूकडच्या अथांग दर्याचे विस्तृत दर्शन होते. बेटाच्या दुसऱ्या टोकावर मनोऱ्यासारख्या दीपगृहाची इमारत दिसते. ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’च्या ताब्यातील बेटावरील या ब्रिटिशकालीन दीपगृहाला कान्होजी आंग्रे यांचे नाव देण्यात आले आहे. हे संरक्षित क्षेत्र असल्याने दीपगृह आतून पाहता येत नाही.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवाजी महाराजांनी आरमाराबद्दल विचार केला तेव्हापासूनच, म्हणजे इ.स. १६७१ पासून त्यांचे  खांदेरी-उंदेरी या समुद्रातील बेटांवर लक्ष होते. इंग्रज, पोर्तुगिजांची लागण झालेल्या मुंबई बंदराच्या तोंडावरील खांदेरी-उंदेरी या बेटांवर आपले मजबूत आरमार असावे, असे त्यांना वाटत होते. त्याप्रमाणे  त्यांनी पावले उचलली होती. इ.स. १६७९ च्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी खांदेरीवरील बांधकामाला सुरुवात केली. यावर लगेच इंग्रजांनी आपले अधिकारी तेथे पाठवून बेट आपल्या मालकीचे असल्याचा कांगावा सुरू केला. मायनाक भंडारी यांनी इंग्रजांना न जुमानता आपले काम अधिक वेगाने चालू ठेवले. ३ सप्टेंबरला इंग्रजांनी बेटाचा ताबा घेण्यासाठी ह्य़ूजेस हा अधिकारी नेमला व ६ सप्टेंबरला तो बेटावर चालून आला. महाराजांनी आपल्या आरमाराचा सेनापती दौलतखान यालाच फौजेनिशी तेथे पाठवून दिले. त्याबरोबर इंग्रज नरमले व माघारी गेले. आता जंजिऱ्याचा सिद्दी कासम जागा झाला व त्याने आडकाठी सुरू केली. पण  महाराज त्यालाही पुरून उरले आणि खांदेरीची मजबूत तटबंदी उभी राहिली. आज एवढी वर्षे होऊन गेली पण तुफान दर्याच्या त्या लाटांना तोंड देत खांदेरीचे तट-बुरुज अद्याप ठामपणे उभे आहेत.
खांदेरी पाहताच आम्ही अन्य एका बोटीने उंदेरीकडे निघालो. ‘साहसे श्री प्रतिवसति’च्या दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली होती. उंच उंच लाटा, घोंघावणाऱ्या त्या उधाणाच्या दर्यातून प्रवास करताना आमच्या काळजात धस्स होत होते. काही वेळेला तर त्या होडग्याच्या दोन्ही बाजूला तीन-चार फुटांची पाण्याची भिंत उभी राहून ती आपल्याला पोटात घेते की काय, असे वाटत होते. बोटीत आलेले समुद्राचे पाणी खलाशी टमरेलने भरून बाहेर टाकत होता.
थोडय़ा वेळातच समुद्री थरारपटानंतर आम्ही उंदेरी बेटाजवळ आलो. पण बेटाला धक्काच नव्हता. यामुळे बोट कुठे लावावी, असा संभ्रम पडला. शेवटी खलाश्यांपैकी दोघांनी अंदाजाने धक्क्य़ाच्या अवशेषांनजिक पाण्यात उडी मारली आणि बोट हातांनी धरून ठेवली. त्यांच्या कमरेच्या वर समुद्राचे पाणी होते. लाटांमुळे  बोट तर वर-खाली होत होती, पण तसेच उतरा म्हणाले. त्यांचा हात धरून खाली उडी मारली आणि कमरेएवढय़ा पाण्यातून दोन-तीन मिनिटांत शिताफीने बेटावर चढलो.
किल्ल्याचे प्रवेशद्वार ठेंगणे. आत शिरल्यावर मात्र अशक्य कोटीतील किल्ला हाती लागल्याचे समाधान लाभले. खांदेरीच्या मानाने हे बेट खूपच लहान असून, मध्यभागी पठारासारखे सपाट मैदान दिसते. अर्थात त्यावर अनेक इमारतींची भुईसपाट झालेली जोती शिल्लक राहिलेली दिसतात. मध्यभागी तर दिवाणखान्यासारखे पण भग्न झालेले चार कोनाडे व एक अवशिष्ट कमान तग धरून शिल्लक आहे. बेटावरून चहूबाजूला कायम अक्राळविक्राळ समुद्र दिसत असतो व त्याला तोंड देत खालच्या अंगाला एक दुहेरी तटबंदीही नजरेस पडते. या तटबंदीला
छोटे बुरुज असून, शेवटच्या बुरुजावर तीन तोफाही आहेत. सुरुवातीच्या बुरुजावरही एक तोफ समुद्राकडे तोंड करून धीराने उभी आहे.  किल्ल्याच्या दक्षिण टोकावरील छोटय़ा प्रवेशद्वारातून दर्याचे दर्शन घेतले आणि मागे फिरलो. अतिशय दुर्लभ असलेल्या या सागरी किल्ल्याचे पोटभर दर्शन घेतले आणि पुन्हा तो दिव्य सागरी प्रवास करत सायंकाळी थळच्या किनाऱ्यावर पाय ठेवले. आपल्या भूमीला पाय लागताच जीवात जीव आला. सुटलो एखदाचे असेच वाटले. आमची ही अवस्था पाहत असताना तो तरुण तांडेल शांतपणे म्हणाला, ‘अहो, आज समिंदर शांत हाय, नाहीतर एरवी तो जोरात हलत असतो.’ हे ऐकूण गारच झालो.

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khanderi and underi water fort in alibaug
First published on: 12-11-2014 at 05:51 IST