नेपाळमधील भूकंपाने सारे जगच हादरले आहे. जगभरातून मदतीचे बंध या देशाकडे वळत असताना यामध्ये अडचणीही खूप येत आहेत. एकतर मूळची डोंगराळ रचना आणि त्या जोडीला भूकंपाने आलेले उद्ध्वस्तपण..यामुळे नेपाळला सावरण्यात मोठय़ा अडचणी येत आहेत. पण याच आव्हानाचा मुकाबला करत मदतीचे हात देण्यासाठी आता गिर्यारोहकही सरसावले आहेत. गिर्यारोहण आणि नेपाळचे नाते हे सर्वश्रुत आहे. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट पासून ते अनेक हिमशिखरे या भूमीच्या अंगणात आहेत. यामुळे पर्यटकांच्या जोडीनेच गिर्यारोहकांचेही या भूमीशी विशेष नाते आहे. या नात्यातूनच या देशावर ओढवलेल्या संकटात मदतीचे हात देण्याचे काम पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेने केले आहे. संस्थेचे उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या भूषण हर्षे, रुपेश खोपडे, आनंद माळी, टेकराज अधिकारी, डॉ. सुमीत मांदळे, अक्षय पत्के, अतुल मुरमुरे, विशाल कडुसकर, दिनेश कोतकर या गिर्यारोहकांच्या संघाने नुकतेच नेपाळच्या दुर्गम भागात जाऊन हे मदतकार्य राबविले. या संघातर्फे मदतकार्यासाठी नेपाळमधील धाडिंग हा दुर्गम भाग निवडण्यात आला होता. या भागातील तब्बल १२ गावांमध्ये जाऊन ‘गिरिप्रेमी’च्या या गिर्यारोहकांनी भूकंपग्रस्तांची सुटका, जखमींवर प्राथमिक उपचार, तात्पुरत्या निवाऱ्याची उभारणी करणे, मातीचे ढिगारे दूर करणे,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्ते तयार करणे, तात्पुरते पूल उभारणे अशा प्रकारची कामे केली. या वेळी संस्थेच्या वतीने अन्नपदार्थ, धान्य, घरगुती वस्तू, कपडे, औषधे, ताडपत्री, मॅट्रेस आदींचे वाटप करण्यात आले.
संस्थेच्या वतीने यापूर्वीही लेहमधील ढगफुटी, उत्तराखंडमधील ढगफुटी, रत्नागिरीतील अतिवृष्टी वेळी मदतीचे हे कार्य राबविण्यात आले होते. अशा आपत्ती वेळी करावयाच्या मदतीसाठीचे प्रशिक्षणही संस्थेतील गिर्यारोहकांना देण्यात आलेले आहे.

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trekkers help in nepal earthquake
First published on: 14-05-2015 at 07:01 IST