पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी याठिकाणी सुरु असलेल्या विकासकामाबाबत माहिती घेतली. वाराणसी दौऱ्यावर असताना मोदींच्या ताफ्यासमोर एक अजब प्रकार घडला. मोदींच्या ताफ्यासमोर दोन बैलांची झुंज लागल्याचे पहायला मिळाले. पंतप्रधानांना झेड प्लस सुरक्षा असते. त्यामुळे त्यांच्या ताफ्यात असंख्य वाहने असतात. परवा मोदींचा ताफा केंट रेल्वे स्थानकावर जात होता. त्यावेळा या ताफ्यासमोर दोन बैलांची झुंज चांगलीच रंगली. प्रत्यक्षात पंतप्रधानांचा ताफा जात असताना त्याच्यासमोर कोणतेही वाहन, व्यक्ती किंवा प्राणी येणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते. मात्र तरीही हे बैल ताफ्यासमोर आलेच.

या प्रकारामुळे काही काळ मोदींच्या ताफ्याला थांबून रहावे लागले. त्यानंतर पोलिसांनी बैलांना बाजूला करुन रस्ता मोकळा करुन दिला. मग पंतप्रधान मोदींची गाडी आणि ताफ्यातील इतर गाड्या पुढे गेल्या. देशाचे पंतप्रधान जात असलेल्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त असताना अशाप्रकारे बैल कसे आले असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला. मोदी ज्या गाडीत होते त्याच गाडीसमोर हे दोन बैल बराच काळ लढत होते. याच गाडीत मागच्या सीटवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बसले होते. या घटनेमुळे मोदींना बनारसमध्ये असणाऱ्या मोकाट पशूंच्या दहशतीबाबत माहिती मिळाली.