राज्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता रविवारी राज्य सरकारने करोनाची साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपाहारगृहे, खासगी कार्यालये, मॉल्स ३० एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर या निर्बंधांची चाहूल मागील काही दिवसांपासूनच लागली होती. मात्र रविवारी सायंकाळी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. हा निर्णय जाहीर होण्याच्या आधी आणि नंतरही नेटकरी महाराष्ट्रामध्ये पूर्ण लॉकडाउन लागतो की काय किंवा निर्बंधांबद्दलचे अनेक मजेदार ट्विट करत होते. शुक्रवारपासून पुण्यात सात दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने महाराष्ट्रातही असेच नियम लागू होतील याची दाट शक्यता सायंकाळी खरी ठरली. मात्र नेटवर याबद्दलची चर्चा रविवार सकाळपासूनच सुरु होती. अनेकांनी यासंदर्भात मिश्कील शब्दात भाष्य केल्याचं पहायला मिळालं. अभिनेता जावेद जाफरीनेही ट्विटरवरुन वांद्रे येथील एका सूचना फलकाचा फोटो शेअर करत करोना निर्बंधांमागील लॉजिक समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय.

वांद्रे येथे राहणाऱ्या जावेदने या ठिकाणी लावण्यात आलेला ‘बॅण्ड्रा टाइम्स’ अशा मथळ्याखालील एका सूचना फलकाचा फोटो शेअर करत, “हे केवळ बॅण्ड्रालाच दिसू शकतं,” असं म्हटलं आहे.

काय आहे या सूचना फलकावर?

या सूचना फलकावर एक मेजशीर वाक्य लिहिण्यात आलं असून अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांना तर दारुच्या दुकानासमोर दोन हजार जणांना का परवानगी देण्यात आलीय याचं कारण यामध्ये सांगितलं आहे. ‘अंत्यसंस्काराला केवळ २० लोकं उपस्थित राहू शकतात कारण तिथे स्पिरीटने म्हणजेच आत्माने शरीरचा त्याग केलाय. मात्र दारुच्या दुकानासमोर २००० लोकं रांगेत उभे राहू शकतात कारण त्यांच्या शरीरामध्ये स्पिरीट जाणार असते,’ असं या सूचना फलकावर लिहिलेलं आहे.

नव्या नियमांनुसार, विवाह सोहळ्यासाठी ५० जण तर अंत्यसंस्काराकरिता २० जणांनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल. तसेच दारुची दुकाने रात्री आठ वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहे.