नवरदेवाने उत्साहाच्याभरात केलेल्या नागिन डान्समुळे लग्न मोडले. उत्तर प्रदेशातील लखीमपूरखेरी भागातील मैलानी भागात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. नवरदेवाचा हा नागिन डान्सबघून नवरीमुलीने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. नवरीमुलगी लग्नास तयार होत नाही म्हणून नवरदेवाने तिथेच तिच्या कानाखाली मारली. यावरुन दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा वाद निर्माण झाला.

वरपक्षाने सर्व भेटवस्तू परत केल्यामुळे दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल न करण्याचा निर्णय घेतला. मुलीकडे आयटीआय डिप्लोमाची पदवी आहे तर नवऱ्यामुलाने कॉलेज शिक्षण अर्ध्यावर सोडले. मैलानीमधील लग्नाच्या हॉलवर वरात पोहोचल्यानंतर नवरदेवाचे मित्र सोबत डान्स करण्यासाठी त्याला घेऊन गेले. मुलीकडचे नातेवाईक विवाहाच्या विधीसाठी नवरदेवाला स्टेजवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्याने मुलीच्या नातेवाईकांबरोबर गैरवर्तन केले.

पण नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर ते प्रकरण मिटले. वधू-वरांनी परस्परांच्या गळयात हार घातल्यानंतर नवरदेवाने पुन्हा डान्स फ्लोअरवर उडी घेतली व नागिन डान्स सुरु केला. नवरदेवाचे हे सर्व वर्तन पाहून संतप्त झालेल्या वधूने तात्काळ लग्न मोडण्याचा निर्णय घेतला व तिथून निघून गेली. नवरदेवाने आणि त्याच्या कुटुंबियांनी मुलीची समजून काढण्याचा प्रयत्न केला. पण वधू आपल्या निर्णयावर ठाम होती.

वादावर काही तोडगा निघत नसताना नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी वधूच्या कुटुंबियांबरोबर पुन्हा गैरवर्तन केले. हा सर्व वाद पोलिसांकडे पोहोचल्यानंतर नवरदेवाच्या कुटुंबाने सर्व भेटवस्तू व हॉलवरील खर्च भरण्याची तयारी दर्शवली. नवरदेव दारुच्या नशेत होता. त्याला कोणाचीही फिकीर नव्हती. लग्नाआधीचे सर्व विधी पूर्ण झाले होते. लग्न मोडण्याचा निर्णयाने आम्ही दु:खी आहोत. पण माझ्या बहिणीचा निर्णय चुकीचा नव्हता असे मुलीच्या भावाने सांगितले.