“परग्रहावरील माणसे म्हणजे एलियन्स अस्तित्वात आहेत. कदाचित ते आपल्यामध्येच राहत असतील,” असे मत ब्रिटनच्या पहिल्या अंतराळवीर असणाऱ्या डॉ. हिलेन शर्मन यांनी व्यक्त केलं आहे. २८ वर्षांपूर्वी अंतराळात जाणाऱ्या सर्वात तरुण ब्रिटीश नागरिक ठरलेल्या हिलेन यांनी, “विश्वात सर्व प्रकारचे सजीव आहेत. कदाचित काहींना आपण पाहू शकत नसू,” असंही म्हटलं आहे.

“एलियन्स आहेत याबद्दल दुमत नाही,” असंही हिलेन यांनी ऑबझर्व्हर मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. “अंतराळामध्ये कोट्यावधी तारे आहेत. तिथे वेगळ्या प्रकारची जीवसृष्टी असूच शकते. पण ते तुमच्या आमच्यासारखे कार्बन आणि नायट्रोजनने बनलेले असतील का? कदाचित नाही. ते आपल्यातही असू शकतात आणि आपण त्यांना पाहू शकत नसू असंही असेल,” असे मत हिलेन यांना व्यक्त केलं आहे.

१९९१ साली अंतराळ मोहिमेसाठी अर्ज केलेल्या १३ हजार लोकांमधून हिलेन यांची अंतराळात जाण्यासाठी निवड करण्यात आली होती. लंडन आणि मॉस्कोमधील राजकीय संबंध सुधारण्यासाठी ब्रिटीश अंतराळवीराला रशियाच्या मीर या अंतराळ स्थानकावर पाठवण्याच्या योजनेअंतर्गत हिलेन यांना आठ दिवसांसाठी अंतराळात पाठवण्यात आले होते.

मात्र २०१३ साली ब्रिटन अवकाश संशोधन केंद्राने अंतराळामध्ये टीम पीक याला पाठवले. त्यानंतर तो २०१५ साली आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर जाणारा पहिला ब्रिटीश अंतराळवीर असल्याचं सांगण्यात आलं. मात्र यामुळे हिलेन यांना अनेकजण विसरले.