सोशल मीडियावर सध्या ‘बॉटल कॅप चॅलेंज’ चांगलेच व्हायरल होत आहे. या चॅलेंजची भूरळ सेलिब्रिटींनाही पडली आहे. अक्षय कुमारसह अनेक बॉलिवूडमधील दिग्गजांनी हे चॅलेंज पूर्ण केलं आहे. यामध्ये आता युवराजची भर पडली आहे. युवराजने ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण केलं असून सचिन तेंडूलकर, शिखर धवन, ख्रिस गेल आणि ब्रायन लारा यांना पूर्ण करण्याचे आवाहन केलं आहे.

युवराजने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये बॅटने चेंडू मारून बॉटलचे टोपन उडवले आहे. हे अनोखं चॅलेंज युवराजने क्रिकेटमधील दिग्गजांना केलं आहे. विशेष म्हणजे युवराज सिंगचे हे अनोख चॅलेंज शिखर धवनने स्वीकारलं आहे. शिखर धवनने ट्विट करत चॅलेंज स्वीकारल्याचे युवराजला सांगितले आहे. दुखापतीमुळे शिखर सध्या विश्वचषकातून बाहेर आहे. युवराज सिंगने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. युवराज सोशल मीडियावर अॅक्टिव असतो.

युवराजच्या या चॅलेंजला रिप्लाय हरभजन सिंगने मजेशिर उत्तर दिले आहे. हरभजन म्हणतो, ‘पाजी, एवढं मोठं चॅलेंज नकोस देऊ, कोणाला होणार नाही.’ तर युवराजच्या या चॅलेंजवर मुनाफ पटेलनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुनाफ चॅलेंज चांगलं असल्याचे म्हटले आहे. युवराजची पत्नी हेजल किचनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान याआधी अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, कुणाल खेमू, गोविंदा, सिद्धार्थ चतुर्वेदी व विद्युत जामवाल यांनाही चॅलेंज पूर्ण केले आहे.

‘बॉटल कॅप चॅलेंज’ नेमकं आहे तरी काय?

यामध्ये आपल्या उंचीला समांतर अशी एक बॉटल समोर ठेवली जाते. त्यानंतर गोल फिरून पायाने त्या बॉटलचं झाकण उडवण्याचा प्रयत्न केला जातो. असं करताना ती बॉटल खाली पडली नाही पाहिजे.