महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे त्यांच्या सोशल नेटवर्किंगवरील पोस्टमुळे कायमच चर्चेत असतात. कधी व्हायरल व्हिडीओंवरील प्रतिक्रिया तर कधी स्वत:हून पुढाकार घेत केलेली मदत यामुळे आनंद महिंद्रा चर्चेत असल्याचं चित्र दिसतं. यावेळीही त्यांनी एका माजी बॉक्ससाठी मदतीचा हात पुढे केलाय. गरिबीमुळे मालवाहतूक करणारी रिक्षा चालवण्याची वेळ आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर असणाऱ्या आबिद खान यांना बॉक्सिंग अकादमी स्थापन करुन देण्यासाठी आपण काय मदत करु शकतो अशी विचारणा आनंद महिंद्रांनी ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेअर करत केलीय.

मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर आबिद खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या कष्ट करुन उपजिवेसाठी कष्ट करणाऱ्या माजी खेळाडूंचा संघर्ष जगासमोर आणणाऱ्या एका युट्यूब चॅनेलने केलेल्या आदिब यांच्या मुलाखतीचा हाच व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी त्यांना मदतीचा हात पुढे केलाय. “धन्यवाद सौरभ, तू आम्हाला आदिबची संघर्षकथा सांगितलीस. खास करुन ते निवेदन न करता स्वत: कष्ट करत आहेत हे कौतुकास्पद आहे. मी सुद्धा दान करण्याऐवजी लोकांचं कौशल्य आणि आवड यामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतो. मी आदिबच्या बॉक्सिंग अकदामीच्या स्टार्टअपला कसा हातभार लावू शकतो यासंदर्भात मला कोणीतरी कृपा करुन मदत करा,” असं ट्विट आनंद महिंद्रांनी केलं आहे.

कोण आहेत आबिद खान?

आबिद खान हे राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंगपटू असून सध्या ते जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या व्हायरल झालेल्या मुलाखतीमध्ये ते सध्या उपजिविकेचं साधन असणाऱ्या निळ्या रंगाच्या मालवाहू टेम्पोसमोर बॉक्सिंगची प्रात्यक्षिकं दाखवताना दिसतात. पुढे बोलताना त्यांनी मध्यमवर्गीय लोकांसाठी क्रिडा क्षेत्रात करियर करणं म्हणजे वेळाचा उपव्यय असून यामधून काही साध्य होत नाही असं आबिद सांगताना दिसतं. तसेच या व्हिडीओमध्ये ते सध्या जगण्यासाठी कशाप्रकारे संघर्ष करावा लागतोय हे सुद्धा सांगतायत. हाच व्हिडीओ शेअर करत आता आनंद महिंद्रांनी आबिद यांना बॉक्सिंग अकदामी स्थापन करण्यासाठी मदतीचा हात पुढे केलाय. यापूर्वीही आनंद महिंद्रांनी अशाप्रकारे अनेकांना मदत केलीय.