पोलिसांनी चोराला पकडल्यानंतर त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी चोर अनेक शकला लढवतात. काहींच्या यशस्वी होतात तर काहींच्या नाही. उत्तर प्रदेशमधील एका साखळीचोराने आपली पोलिसांपासून सुटका होण्यासाठी काय केले माहितीये? या चोराने पोलिसांना डान्स करुन दाखवत त्यांच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर हा प्रयत्न असफल झाला.

पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये रिंकू भदोरीया या चोराला पकडले. त्यानंतर आपल्याकडून आता चुकीने हा प्रकार झाला असून आपण प्रोफेशनल डान्सर आहोत असे त्याने पोलिसांना सांगितले. गंमत म्हणजे पोलिसांना हे पटवून देण्यासाठी त्याने डान्सच्या अनेक स्टेप्सही करुन दाखविल्या. यानंतर पोलिसांनी त्याला मायकल जॅक्सनच्या काही स्टेप्स करुन दाखव असे सांगितल्यावर त्याने अतिशय उत्तमपद्धतीने तेही सादर करुन दाखवले. त्याचा हा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये तो कशापद्धतीने डान्स करत आहे हे आपल्याला सहज दिसत आहे.

पोलिसांनी त्याची चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला तो आपला गुन्हा कबूल करत नव्हता. मात्र काही वेळाने त्याने आतापर्यंत जवळपास १०० हून अधिक साखळ्या चोरल्या असल्याचे कबूल केले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार भदोरीया वयाच्या १६ व्या वर्षापासून चोरी करत असून तो डान्सबरोबर सातत्याने गुन्हेही करतो. या व्हिडिओमध्ये रात्रीच्यावेळी पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर तो त्यांना डान्स करुन दाखवायला लागला. त्यामुळे चोरातील कला पोलिसांना पाहायला मिळाली. तो साधारण २ महिने आधीपासून महिलांवर पाळत ठेवायचा आणि त्यानंतर त्यांचे दागिने चोरायचा असे पोलिसांनी सांगितले.