गेल्या काही दिवसांपासून पर्यटनाकडे अनेकांचाच ओढा वाढला आहे. मुख्य म्हणजे पर्यटकांच्या वाढत्या संख्येसोबतच पर्यटन स्थळांचीही संख्या तितक्याच वेगाने वाढत आहे. अदभुत, अविश्वसनीय, अद्वितीय अशी ही ठिकाणं पाहून अनेकदा आपला यावर विश्वासच बसत नाही. सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती अशाच एका पर्यटन स्थळाची. किंबहुना एका सेतूची. व्हिएतनाममध्ये असणारा हा सेतू ‘गोल्डन ब्रिज’ म्हणून ओळखला जात आहे. दोन हातांवर जणून या सेतूचा संपूर्ण भार आहे, अशी त्याची आखणी करण्यात आली असून, त्याच प्रकारे अतिशय प्रत्ययकारीपणे त्याची बांधणीही करण्यात आली आहे.

जून महिन्यात हा सेतू पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. या सेतूकडे पाहिलं असता, सिमेंटच्या दोन हातांची अशी काही आखणी करण्यात आली आहे जणू त्या दोन दैवी हातांवर आधारलेल्या एका सुरेख मार्गावरुन चालण्याची संधीच पर्यटकांना मिळत आहे. झाडांमधून हे हात वरच्या दिशेने आल्याचं भासवत ते जणू पृथ्वीच्या पोटातूनच वर आले आहेत, अशीच अनुभूती पाहताक्षणी होते. त्यातही या सेतूवरुन जातेवेळी एका वेगळ्याच दुनियेतील वाटांचे वाटाडे झाल्याची भावना अनेकांना होत असेल यात वाद नाही. कलेला तंत्रज्ञानाची जोड देत साकारण्यात आलेल्या या सेतूविषयी आता तो साकारणाऱ्यांच्या मनातही अभिमानाची भावना पाहायला मिळत आहे.

छाया सौजन्य- एफपी

‘आम्ही तयार केलेला हा सेतू सध्या सर्वांचच लक्ष वेधत आहे हे पाहून मला प्रचंड अभिमान वाटतोय’, असं प्रिन्सिपल डिझायनर आणि टीए लँडस्केप आर्किटेक्चरचे संस्थापक वू व्हिएत अन्ह, ‘एएपपी’ला दिलेल्या माहितीत म्हणाले. फ्रेंच वसतीकरण्याच्या काळात साधारण १९१९ मध्ये सर्वांसमक्ष आलेल्या एका पर्वतीय भागात हा १५० मीटर लांब सेतू उभारण्यात आला आहे. जो उंचच उंच डोंगररांगा आणि जंगलातून वाट काढत जात आहे. पर्यटकांच्या विशलिस्टमध्ये सहभागी झालेल्या या सेतूला ‘काऊ वांग’ असं नाव देण्यात आलं आहे. ज्याचा सोपा अर्थ गोल्डन ब्रिज असाही होतो.

https://www.instagram.com/p/Bl10RNRBi9W/

Get set post…- जगातलं सर्वाधिक उंचीवरील पोस्ट ऑफिस भारतात, तुम्ही पाहिलं का?

सोशल मीडियावर या ठिकाणाचे फोटो व्हायरल झाल्यापासून अनेकांनीच त्याविषयी आणखी माहिती जाणून घेण्यासही सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे बा ना हिल्सवर उभारण्यात आलेल्या या सेतूची बांधणी सन ग्रुपतर्फे करण्यात आली आहे. तेव्हा आता दीर्घ सुट्टीचा बेत आखत असाल तर, तुम्ही या सुरेख वाटेवरुन जाणार ना, गोल्डन ब्रिजला भेट देणार ना?