करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात करण्यात आलेल्या लॉकडाउनचा आज १२ वा दिवस आहे. शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी जनतेशी संवाद साधत पाच एप्रिल रोजी रात्री सर्व भारतीयांनी घरातील लाईट (प्रकाशदिवे) बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केलं. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटली. मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतलं ते अमूलच्या कार्टूनने. आपल्या हटके कार्टून्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या अमूलने या दिवा, मेणबत्ती लावण्यावरील एक कार्टून प्रसिद्ध केलं असून ते लोकांना प्रचंड आवडत आहे.

अमूलने शेअर केलेल्या कार्टूनमध्ये अमूल गर्ल अंधारात एक कंदील आणि मेणबत्ती घेऊन उभी आहे. या फोटोमध्ये  ‘बत्ती ऑफ बटन ऑन’! असं लिहिण्यात आलं आहे. तसंच कॅप्शनमध्ये रविवारी रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी ‘मेणबत्ती, दिवा लावा’, असं आवाहनही केलं आहे. विशेष म्हणजे अमूलचं हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शेअर केलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्युची घोषणा करत संध्याकाळी ५ वाजता थाळीनाद करायला सांगितला होता. मोदींच्या या आवाहनाला भारतीयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता. त्यानंतर मोदी यांनी पुन्हा एकदा देशवासियांना नवीन आवाहन केलं आहे. रविवारी(५ एप्रिल) देशातील प्रत्येक नागरिकाने घरातील लाईट बंद करुन दरवाजा, खिडकीत मेणबत्ती किंवा बॅटरी लावण्यास सांगितलं आहे.