पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा (मॅग्नेटीक फिल्डचा) काही भाग क्षीण होत असून नक्की हे कशामुळे होत आहे यासंदर्भात अद्याप वैज्ञानिकांना कोणतेही ठोस कारण सापडलेले नाही. उपग्रहाच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीच्या आधारे आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या प्रदेशातील चुंबकीय क्षेत्र कमकुवत होत असल्याचे वैज्ञानिकांनी दिसून आलं आहे. ही चिंताजनक बाब असल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण अटलांटिकमधील काही प्रदेश मागील काही वर्षांमध्ये बऱ्याच प्रमाणात रुंद झाला असल्याचे निरिक्षण वैज्ञानिकांनी नोंदवलं आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ईएसए) उपग्रहांच्या समुहाने पृथ्वीचे चुंबकीय क्षमता २४ हजार नॅनोटेस्लापासून २२ हजार नॅनोटेस्लापर्यंत कमी झाल्याचे निरिक्षण नोंदवलं आहे. यामुळे ज्या प्रदेशावर परिणाम झाला आहे तो दक्षिण अटलांटिकमधील भूप्रदेशाची रुंदी वाढली असून तो दरवर्षी सुमारे २० किमी वेगाने पश्चिमेकडे सरकत आहे. अशाच प्रकारचा बदल दक्षिण आफ्रिकेच्या नैऋत्येकडेही दिसून येत आहे. त्यामुळेच दक्षिण अटलांटिकमधील प्रभावित भूभागचे दोन वेगळे तुकडे होण्याचे संकेत मिळत असल्याने वैज्ञानिकांच्या चिंतेत भर पडली आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द इंडिपेडंट’ने दिलं आहे.

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र हे पृथ्वीच्या गर्भात असणाऱ्या वितळलेल्या लोहाच्या गाभ्याच्या (अर्थ कोअरच्या) हालचालींद्वारे तयार होते. चुंबकीय क्षेत्रामुळे अंतराळातमधील इतर गोष्टांपासून पृथ्वीचा बचाव होतो. हे क्षेत्र पृथ्वीसाठी एखाद्या ढालीप्रमाणे काम करते. चुंबकीय क्षेत्रामुळेच सूर्याच्या हानिकारक किरणोत्सर्गापासून सजीवांचे रक्षण होतं. मजबूत चुंबकीय क्षेत्रामुळे अंतराळामधून पृथ्वीच्या पृष्ठभागावर येणाऱ्या घातक उत्सर्जनवर (रेडिएशनवर) नियंत्रण राहते. “आपण ज्या जमिनीवर उभे आहोत त्या खाली तीन हजार किमीचे अती तप्त आणि सतत फिरणाऱ्या लोहाचा जणू महासागर आहे. याच लोहामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. एखाद्या सायकसारख्या यंत्रणामध्ये यांत्रिक शक्तीचे रूपांतर विदयुतशक्तीत करणाऱ्या यंत्राप्रमाणे या लोहामुळे विद्युत प्रवाह तयार होतात. याच विद्युत प्रवाहांमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते,” असं वैज्ञानिक सांगतात.

“दक्षिण अटलांटिकमधील भूप्रदेशामध्ये निर्माण झालेली विसंगती ही किमान गेल्या दशकात दिसून येत होती. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये यामध्ये अत्यंत वेगाने बदल झाल्याचे पहायला मिळालं आहे. दक्षिण अटलांटिकवर नजर ठेवण्यासाठी उपग्रह असल्याने हे बदल समजण्यास आपल्याला मोठा फायदा झाला आहे. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये असे काय बदल होत आहेत ज्यामुळे चुंबकीय क्षेत्रावर परिणाम दिसून येत आहे हे जाणून घेण्याचे आव्हान आता वैज्ञानिकांसमोर असणार आहे,” असं मत जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओ सायन्सच्या जर्गेन मॅट्स्को यांनी व्यक्त केलं.

पृथ्वीचा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव एकमेकांची जागा घेण्याची ही प्रक्रिया असू शकते. त्यामुळेच दोन प्रदेशातील चुंबकीय क्षेत्र क्षीण होत असल्याचा अंदाज ईएसएने व्यक्त केला आहे. यापूर्वीही अशाप्रकारे दोन्ही ध्रुवांनी आपली जागा बदलल्याचे वैज्ञानिक सांगतात. सामान्यपणे दोन लाख ५० हजार वर्षांनी अशापद्धतीने दोन्ही ध्रुव एकमेकांची जागा घेतात असं वैज्ञानिक सांगतात.

काय परिणाम होणार?

दोन्ही ध्रुवांनी जागा बदलल्यास पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र ज्या पद्धतीने हानिकारक वैश्विक किरणांपासून तसेच अंतरामधील घातक वाऱ्यांपासून संरक्षण करते ती पद्धत बदलण्याची शक्यत आहे. ध्रुवांनी एकमेकांची जागा घेतल्यास उपग्रहांवर याचा मोठा परिणाम होईल. यामध्ये दूरसंचार प्रणाली, मोबाइल फोन्सबरोबरच एकूणच संवाद प्रणालीवर मोठा परिणाम होऊ शकतो. या यंत्रणांचे काम पूर्णपणे किंवा अंशत: ठप्प होऊ शकते. इतकच नाही तर चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल झालेल्या भूभागावरुन विमानाने उड्डाण केल्यास त्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यताही वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. सामान्यपणे दोन्ही ध्रुवांनी एकमेकांची जागा घेणे ही लांबलचक आणि दिर्घकालीन घटना आहे ही घटना एका दिवसात किंवा काही महिन्यांमध्ये होत नाही. अगदी नजीकच्य काळात असे ध्रवांची जागा पूर्णपणे बदलण्याची शक्यताही खूपच कमी आहे. मात्र जेव्हा केव्हा असा बदल होईल त्याचा मोठा परिणाम मानवी आयुष्यावर होईल हे मात्र नक्की.