प्रत्यक्षात मानवाने प्राण्यांच्या निवासस्थानांवर अतिक्रमण केले आहे. असे असले तरी, प्राणीच आपल्या निवासावर अतिक्रमण करत असल्याची त्याची ओरड अनेकदा ऐकायला मिळते. एक हत्ती त्याच्या पिल्लासह अन्नाच्या शोधात तमिळनाडू येथील कोईम्बतूरमधील एका घरात शिरला. आता दोन हत्ती घरात शिरले म्हटल्यावर त्यांनी घर उध्वस्थ केले असेल असे आपल्याला सहाजिकच वाटेल. पण या हत्तीनी असे काहीच न करता घरात अन्न न दिसल्याने तिथून शांतपणे काढता पाय घेतला.

प्राण्यांचे इतके सामंजस्य पाहून ही घटना घटना समोर आल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हत्ती घरात शिरुन बाहेर येण्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. एएनआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओच्या माध्यमातून प्राण्यांमधील सभ्यता पाहायला मिळते. यामध्ये हत्ती आणि पील्लू दोघेही घराच्या बाहेरील शेडमधून घरात जाताना दिसतात. त्यांना घरात खाण्यासाठी काहीच मिळत नाही. काहीवेळ तेथे रेंगाळत दोघेही अतिशय शांतपणे तेथून निघून जातात.  जंगली प्राण्यांनी अशाप्रकारे शांतपणे निवासी भागात येणे आणि कोणतीही हानी न करता परतणे हे खऱ्या अर्थाने आश्चर्यकारक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.