करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या संपूर्ण जगावर खडतर संकट ओढावलेलं आहे. अनेकदा आपण माणुसकीला काळीमा फासणाऱ्या, माणूस आणि प्राण्यांमधील संघर्षाच्या बातम्या वाचत असतो. पण तामिळनाडूमधील एका गावाने, पक्ष्याच्या अंड्यांची जोपासना करण्यासाठी तब्बल ३५ दिवस अंधारात राहण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील एका गावात गावकऱ्यांनी पक्ष्याची अंडी वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला.

गावाला वीजपुरवठा करणाऱ्या मेन स्विच बोर्डमध्ये Indian Robin या प्रजातीच्या पक्ष्याने आपलं घरट तयार केलं. लॉकडाउन काळात या गावातील विद्यार्थी एय करपुराजा याला ही गोष्ट लक्षात आली. “गावात वीज पुरवठा करण्यासाठीचा मेन स्विचबोर्ड हा माझ्या घराजवळ आहे. लॉकडाउन काळात एक पक्षी तिकडे घरटं तयार करतो आहे हे मी पाहिलं होतं. एक दिवशी मी ते घरटं पहायला गेलो तेव्हा मला तिकडे तीन अंडी दिसली. मी लगेच या प्रकरणात माझ्या गावतल्या व्यक्तींची मदत घेण्याचं ठरवलं. गावतल्या एका व्हॉट्स अप ग्रूपवर करपुराजाने ही घटना सांगितली. त्या ग्रूपमधील ३५ सदस्यांनी या पक्ष्याची अंडी वाचवण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला.” टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत असताना करपुराजाने माहिती दिली.

आपले मित्र तयार झाल्यानंतर करपुराजाने गावातील इतर सदस्यांचा होकार मिळवण्यासाठी प्रयत्न केले. महत्वाची गोष्ट म्हणजे गावकऱ्यांनीही त्याच्या या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद दिला. गावाचे सरपंच एच. कालेश्वरी यांनीही करपुराजाच्या प्रयत्नांना साथ देऊन प्रत्येक गावकऱ्याला पुढचे काही दिवस रात्री अंधारात राहण्याची विनंती केली. पक्ष्याची पिल्लं सुखरुप जन्म घेईपर्यंत या गावातील नागरिकांनी अंधारात राहणं पसंत केलं. सध्याच्या घडीला आजुबाजूला अनेक वाईट घटना घडताना आपण पाहतो. पण तामिळनाडूतल्या या गावाने जग हे आजही चांगल्या व्यक्तींमुळे चालू आहे हे दाखवून दिलंय.