करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन असल्याने प्रवासावर निर्बंध आहेत. त्यामुळे देशाच्या विविध भागांत अडकून पडलेल्या मजुरांचे प्रचंड वांदे होतायेत. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेल्या अशाच १८ मजूरांना मध्य प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना क्वारंटाइन केले आहे. धक्कादायक म्हणजे हे मजूर चक्क एका सिमेंट-मिक्सर ट्रकमधून प्रवास करत होते.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, एका ‘सिमेंट मिक्सर ट्रक’मध्ये लपून आपल्या गावी निघालेल्या १८ मजुरांना इंदूर पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. खबरदारी म्हणून पोलिसांनी सर्वांची क्वारंटाइन सेंटरमध्ये रवानगी केली आहे. “ते सर्व महाराष्ट्रातून लखनऊला चालले होते. ट्रक पोलिस स्थानकात पाठवण्यात आला असून याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे”, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक उमाकांत चौधरी यांनी दिली. पोलिसांनी पकडल्यानंतर सिमेंट-मिक्सर ट्रकमधून एका पाठोपाठ बाहेर पडणाऱ्या या मजुरांचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने जारी केला आहे.

पाहा व्हिडिओ – 

दरम्यान,  करोना टाळेबंदीमुळे देशाच्या विविध भागांत अडकून पडलेले मजूर, यात्रेकरू, विद्यार्थी, पर्यटक यांना त्यांच्या राज्यात परतणे शक्य व्हावे म्हणून विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय काल(दि.१) केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे.  रेल्वे मंत्रालयाने अशा सहा विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. या रेल्वेगाड्यांमध्ये प्रत्येक डब्यात ७२ ऐवजी फक्त ५४ प्रवासी असतील. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर मध्य रेल्वेने नाशिकमधून भोपाळसाठी शुक्रवारी रात्री ९.३० वाजता विशेष रेल्वेगाडी सोडली. याशिवाय, शुक्रवारी पहाटे ४.५० वाजता तेलंगणातील लिंगमपल्लीहून १२०० मजुरांना घेऊन जाणारी विशेष रेल्वेगाडी हटियासाठी (झारखंड) सोडण्यात आली. अलुवा (केरळ) ते भुवनेश्वर (ओडिशा), जयपूर (राजस्थान) ते पाटणा (बिहार) आणि कोटा (राजस्थान) ते हटिया (झारखंड) अशा विशेष रेल्वेगाडय़ा सोडल्या जाणार आहेत. या विशेष रेल्वेगाडय़ा प्रारंभ स्थानावरून थेट गंत्यव्य स्थानापर्यंत जातील.