भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ११ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. गेल्या आठवड्याभरापासून देशभरात विराट- अनुष्काच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. सुरूवातीला ही निव्वळ अफवा असल्याच बोललं गेलं. मात्र, तरीही चाहत्यांना या दोघांच्या लग्नाबद्दल भलतंच कुतूहल होतं. अखेर काल रात्री दोघांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या विवाहाची औपचारिक घोषणा केली.

दोघांनी फोटो शेअर केल्यानंतर जगभरातील चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. विराटनं इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केलेल्या फोटोला १९ तासांच्या आत ३५ लाख दहा हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनुष्काच्या फोटोलाही २६ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. जर पुढच्या दोन आठवड्यात या दोघांच्या फोटोंना दुप्पट लाईक्स मिळाले तर २०१७ सालातील सर्वाधिक लाईक्स मिळालेल्या फोटोंमध्ये विराट-अनुष्काच्या फोटोंचाही समावेश होईल. सध्या सर्वाधिक लाईक्स मिळालेल्या इन्स्टाग्राम फोटोच्या यादीत सेलेना गोमेझचा फोटो दहाव्या क्रमांकावर आहे. २५ व्या वाढदिवसानिमित्त सेलेनानं अपलोड केलेल्या या फोटोला सत्तर लाखांहून अधिक लाईक्स आहेत. त्यामुळे पुढील दोन आठवड्यात विराट-अनुष्काच्या लग्नाच्या फोटोला सत्तर लाखांपेक्षा अधिक लाईक्स आले तर नक्कीच इन्स्टाग्रामच्या यादीत त्यांना स्थान मिळेल.