स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आठवला की प्रत्येक भारतीयाला इंग्रजांनी केलेली अन्याय-अत्याचार आठवतात. आजही तो काळ आठवला की अंगावर शहारे येतात. मात्र स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशातील अनेकांनी हसत-हसत आपल्या प्राणांची आहुती दिली. आजही इतिहासात या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची नोंद आहे. विशेष म्हणजे इंग्रजांनी केवळ भारतीयांनाच बंधनात ठेवलं असं नाही. तर त्यांच्या राज्यात असताना एका ब्रिटीश अधिकाऱ्याने चक्क एका झाडाला अटक केली. इतकंच कशाला तर आजही हे झाडं पाकिस्तानात साखळदंडाने बांधलेलं आहे.

साधारणपणे कोणताही गुन्हा केला की त्याला पोलीस अटक करतात. मात्र १८९८ मध्ये एका ब्रिटीश अधिकाऱ्याने दारुच्या नशेमध्ये असताना एका झाडाला अटक करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे हे झाड आजही पाकिस्तानमध्ये असलेल्या पख्तूनख्वाह येथे साखळदंडाने बंदिस्त आहे.

ब्रिटीशांचं राज्य असतांना एका ब्रिटीश अधिकाऱ्याने दारुच्या नशेमध्ये झाडाला बांधण्याचे आदेश दिले होते. दारुच्या नशेमध्ये असल्यामुळे हे झाड पळू जात असल्याचा भास या अधिकाऱ्याला झाला होता. त्यामुळे त्याने या झाडाला साखळदंडाने बांधून ठेवण्यास सांगितलं. परंतु आज १२१ वर्ष झाले तरीदेखील हे झाड साखळ्यांमध्ये जखडलेलं आहे.

दरम्यान, पाकिस्तान स्वतंत्र झाला मात्र हे झाड आजही बंधनात आहे. अनेक जण असं म्हणतात की, इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराचं हे एक उदाहरण आहे त्यामुळे या झाडाला साखळदंडातून अद्यापही मुक्त केलेलं नाही. तसंच या झाडावर एक पाटी अडकविण्यात आली आहे. त्यावर ‘I am Under arrest’ असंही लिहीलं आहे.