कोट्यवधी रुपयांच्या नव्या कोऱ्या ‘लॅम्बॉर्गिनी’ कारचा खरेदीनंतर अवघ्या २० मिनिटात चुराडा झाल्याचा प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. एखाद्या चित्रपटात घडावा असा प्रसंग प्रत्यक्षात घडला आहे. कोणी स्वप्नातही विचार केला नसेल असं ‘लॅम्बॉर्गिनी’ गाडीचे झालेले नुकसान आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार एक कोटी ८० लाख रुपयांना खरेदी केलेल्या ‘लॅम्बॉर्गिनी’ कारचा अवघ्या २० मिनिटांतच अपघात झाला असून गाडीचा चुराडा झाला.

वेस्ट यॉर्कशायर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लॅम्बॉर्गिनी’ कार अपघातापूर्वी अवघी २० मिनिटं आधीच खरेदी केली होती. शोरुमधून बाहेर निघाल्यानंतर काही अंतरावरच गाडी तांत्रिक खराबीमुळे रस्त्यावरच अचानक बंद पडली. त्याचवेळी एका भरधाव वेगाने येणाऱ्या व्हॅनने टक्कर दिली. त्यामुळे नव्या कोऱ्या ‘लॅम्बॉर्गिनी’ गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

पोलिसांनी लॅम्बॉर्गिनीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहलेय की, ‘M1 वेस्ट यॉर्कशायरमध्ये लॅम्बॉर्गिनी गाडी अचानक रस्त्यावर थांबली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या व्हॅनने लॅम्बॉर्गिनीला जोरदार धडक दिली.’ पोलिसांनी लॅम्बॉर्गिनीचा शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

लॅम्बॉर्गिनी आणि व्हॅनच्या चालकांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळील रूग्णालयात उपचार सुरु आहेत.