मध्य प्रदेशात असलेल्या पूरस्थितीमुळे गर्भवतीला रुग्णालयात नेताना मोठी तारांबळ उडाली. रस्त्यांवर पाणी साचल्याने अँम्ब्युलन्स येऊ शकत नव्हती. त्यावेळी या गर्भवतीला प्रसूतीकळा सुरु झाल्याने तिला घरातील कॉटसकट उचलून तिच्यावर प्लास्टीक टाकून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. ही घटना मध्यप्रदेशातील टिकमगर येथे घडली. विशेष म्हणजे ही घटना कॅमेरात कैद झाली आणि तो व्हिडियो अगदी कमी वेळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला. एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन तो शेअर केला असून नेटीझन्सनी त्यावर जोरदार टिका केली आहे.

या महिलेच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला प्रसूतीवेदना सुरु झाल्यानंतर आम्ही १०८ या क्रमांकावर अॅंम्ब्युलन्ससाठी फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावरुन कोणताही प्रतिसाद आला नाही. काही खासगी रुग्णालयांमध्येही अँम्ब्युलन्ससाठी विचारणा केली. मात्र रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने गावात अँब्युलन्स पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे घरातील लोकांनी या महिलेला कॉटवर घालून रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला आणि पाण्यातून तिला तसे नेलेही. ४ जण गुडघाभर पाण्यातून महिलेला नेत असल्याचे दिसत आहे. एकाने तिच्या चेहऱ्यावर छत्री धरल्याचेही दिसत आहे.

याआधी काही दिवसांपूर्वी याच गावात एका तरुणाने अॅंम्ब्युलन्स न मिळाल्याने आपल्या आईचा मृतदेह दुचाकीवरुन वाहून नेला होता. साप चावल्यने या महिलेचा मृत्यू झाला होता. जिल्हा रुग्णालयाने कोणतेही कारण न देता अँम्ब्युलन्स देता येणार नाही असे सांगितले होते. या घटनेचा व्हिडियोही सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. त्यावरुनही प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली होती.