करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये २५ मार्चपासून सुरु असणाऱ्या लॉकडाउनमुळे अनेक स्थलांतरित मजुरांचे हाल झाले आहे. अनेक राज्यांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांनी चालत आपल्या राज्याची वाट धरली आहे. तर मे महिन्याच्या सुरुवातीपासून वेगवेगळ्या राज्यांमधून या अडकलेल्या मजुरांना स्वत:च्या राज्यात पोहचवण्यासाठी श्रमिक विशेष ट्रेन्स सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र या ट्रेनमध्ये खाण्याची सुविधेवरुन अनेकदा तक्रारी समोर आल्या आहेत. या ट्रेनमधील प्रवाशांचे खाण्याचे हाल होत असल्याने दिल्ली रेल्वे स्थानकावर या श्रमिक ट्रेनने जाणाऱ्या मजुरांनी दुकानांमधील सामान चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी ओल्ड दिल्ली रेल्वे स्थानकामध्ये श्रमिक विशेष ट्रेन थांबली असता या ट्रेनमधील मजुरांनी स्थानकातील दुकांनामधील सामान पळवले. व्हिडिओमध्ये ट्रेन स्थानकात थांबल्यानंतर प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या खाण्याच्या लहानश्या गाडीवर वेफर्सची पाकिटं, बिस्कीटचे पुडे आणि पाण्याच्या बाटल्या असल्याचे काही मजुरांना दिसले. पोलीस हवालदार त्या ठिकाणी नसल्याचा फायदा घेत काही जणांनी या दुकानातील सामान ओरबडून घेत ट्रेनमध्ये पळ काढला. यामध्ये वेफर्सच्या पाकिटांच्या संपूर्ण माळा पळवून नेणाऱ्या मजुरांपासून खाण्याच्या वस्तूंसाठी झपाटपटी करणारे मजुरही दिसत आहेत. व्हिडिओमध्ये हे मजूर एकमेकांच्या हातातील सामान खेचतानाही आणि आरडाओरड करताना दिसत आहेत. अवघ्या काही क्षणामध्ये या मजुरांनी दुकानावरील सामान मिळेल तसे ओरबाडले आणि तिथून पळ काढण्याचा सर्व गोंधळ व्हिडिओत कैद झाला आहे. हा व्हिडिओ आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रमिक मजुरांचे बरेच हाल होतानाचे चित्र मागील काही आठवड्यांपासून दिसत आहे. शेकडो किलोमीटर पायी प्रवास करुन आपल्या घरी पोहचण्याच्या प्रयत्न असलेल्या काही मजुरांचा वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये मृत्यू झाल्याच्या बातम्याही मागील काही आठवड्यांमध्ये समोर आल्या आहेत. असं असतानाच मजुरांसाठी सुरु करण्यात आलेल्या श्रमिक ट्रेन जिथून सुटतात त्या ठिकाणी काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्नाचे वाटप केले जाते. तर काही ठिकाणी या मजुरांना खाण्याचे पदार्थ दिले जात नसल्याची तर काही ठिकाणी चांगल्या दर्जाचे अन्न दिले जात नसल्याच्याही तक्रारी समोर येत आहेत. याच कारणामुळे दिल्ली रेल्वे स्थानकातील प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशमधील एका स्थानकामध्ये श्रमिक ट्रेनमध्ये मजुरांची खाद्य पदार्थांवरुन हाणामारी झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.