राजकीय नेत्यांचे शिक्षण आणि त्यांच्या पदव्या हा नेहमीच वादाचा विषय ठरतो. आता आपल्या शिक्षणाचे बिंग कधीना कधी तरी फुटणारच हे माहिती असताना खोटे बोलून नये हा साधा नियम अनेकांना पाठच आहे. पण असे असताना चक्क एका मुलाखतीत खोटे बोलण्याचे धाडस एका आमदाराने केले. त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर चर्चा झाली नाही तर नवलच म्हणावे लागेल.

वाचा: भाजीवालीचा उपक्रम, घरात शौचालय दाखवा आणि १ किलो टोमॅटो मोफत मिळवा

आंध्रप्रदेशमधल्या तेलगू देसम पक्षाचे आमदार जलील खान यांची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या शिक्षणाबद्दल त्यांना विचारले असता आपण बीकॉम केले आहे असे उत्तर त्यांनी मुलाखत घेणा-याला दिले. मला भौतिकशास्त्र आणि गणितात अधिक रस होता म्हणून मी बीकॉम केले असे त्यांनी सांगितले. आता आपल्या आमदाराची चूक सुधारण्यासाठी पत्रकाराने हे विषय बीकॉमला नसतात असे सांगितले पण आमदार आपल्या उत्तरापासून मागे हटायला काही तयार नव्हते. खोटे बोल पण रेटून बोल असाच काहीसा प्रकार आमदारांनी केला. यातूनही कहर म्हणजे आपल्याला गणितात १०० पैकी १०० गुण मिळाले असेही जाहिर करून टाकले.

VIDEO : दोस्त असावा तर असा! तिच्यासाठी दोन दिवस तो रेल्वेरुळावर बसून होता

आमदारांचे हे जरा अती होतंय हे पाहताच मुलाखत घेणा-याने आपण स्वत: बीकॉम केले असल्याचे सांगितले. बीकॉमला हे दोन विषय नसतात हे त्यांनी सविस्तर सांगितले पण आमदार जलील खान काही माघार घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे, आता आमदारांची खिल्ली उडवली नाही तर नवलच. त्यामुळे त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.