आशिया कप स्पर्धेमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी असणारे भारत पाकिस्तान संघ १९ सप्टेंबरला पहिल्यांदा एकमेकांसमोर उभे राहिले. या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. जरी या समान्यात पाकिस्तानी संघ हरला तरी पाकिस्तानच्या एका चाहत्याने भारतीयांची मने जिंकली आहेत. आदिल ताज असे या पाकिस्तानी चाहत्याचे नाव आहे. आणि तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे त्यामागील कारण म्हणजे त्याने स्टेडियममध्ये पाकिस्तानी राष्ट्रगीत गाऊन झाल्यानंतर भारताचे राष्ट्रगीतही गायले. भारताचे राष्ट्रगीत गाणाऱ्या आदिलचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

भारत-पाकिस्तान सामन्य म्हटल्यावर त्याला एक वेगळेच वलय प्राप्त होते. यात अगदी राजकीय संबंधांपासून ते मैदानावर आणि मैदानाबाहेरचीही खुन्नसची चांगलीच चर्चा रंगते. मात्र आदिलने केलेला प्रयत्न हा या विरोधात वेगळा ठरल्यानेच तो व्हायरल झाल्याचे बोलले जात आहे.

या प्रसंगाबद्दल बोलताना आदिल म्हणतो, मी खूप भारतीय सिनेमे पाहतो. असं एकदा मी कभी खुशी कभी गम सिनेमा पाहताना त्यामध्ये भारताचे राष्ट्रगीत ऐकले होते. त्यावेळी माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता असे त्याने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. मैदानात नक्की काय झाले याबद्दल बोलताना आदिल म्हणतो, ‘आमच्या आजूबाजूला अनेक भारतीय चाहते बसले होते. ज्यावेळी पाकिस्तानचे राष्ट्रगीत सुरु झाले त्यावेळे ते लोक उभे राहून टाळ्या वाजवताना दिसले. म्हणूनच मी भारताचे राष्ट्रगीत सुरु झाले तेव्हा ते गायल्याचे आदिलने सांगितले.

शांततेच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे असं आपल्याला म्हणता येईल असंही आदिलने सांगितले.

पाहा > VIDEO: त्यांच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला भारतीयांचे ‘गणपती बाप्पा मोरया’ने उत्तर

दरम्यान या सामन्यातील आणखीन एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये पाकिस्तानच्या चाहत्यांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे देताना दिसतात तर त्याला भारतीय चाहत्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ने उत्तर दिले आहे.