हिंदी चित्रपटातील खलनायक प्रकाश राज यांनी काही मुद्दय़ांवर आजवर सरकारविरोधात आवाज उठवला आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निषेधाचे फलक दाखविण्यात आले. या निदर्शनांची चार छायाचित्रे प्रकाश राज यांनी नुकतीच ‘ट्विट’ केली आहेत. मात्र प्रत्यक्षात ही छायाचित्रे जुनी आहेत; याशिवाय ती वेगवेगळ्या ठिकाणांवरून घेण्यात आली आहेत. यात अमेरिका, लंडन आणि नवी दिल्लीचा समावेश असून ती २०१३ आणि २०१५ सालची आहेत.

पहिल्या छायाचित्रात न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाबाहेर शिरोमणी अकाली दलाच्या अमेरिकेतील गटाने स्वतंत्र खलिस्तान निर्मितीला समर्थन देणाऱ्या घोषणा आणि मोदीविरोधी घोषणा दिल्या होत्या. एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मोदी येथे आले होते. या वेळी सुरजितसिंग काल्हार यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शन करण्यात आली होती.

दुसऱ्या छायाचित्रात २०१५ साली मोदी आणि ‘फेसबुक’चा संस्थापक मार्क झकरबर्ग यांच्या भेटीदरम्यान निदर्शने करण्यात आली होती. ‘अलायन्स फॉर जस्टिस अँड अकाऊंटॅबिलिटी’ या गटाच्या कार्यकर्त्यांनी २००२ साली गुजरातेतील दंगलीचा निषेध करण्यासाठी ‘मोदी फेल’ असे फलक फडकावले होते. त्यामुळे सरकारविरोधी आवाज उठविणारे सर्व राष्ट्रविरोधीच आहेत का, असा सवाल करणाऱ्या प्रकाश राज यांचा हेतू स्वच्छ असला तरी त्यांनी ‘ट्विट’ केलेली छायाचित्रे मात्र जुनीच आहेत.