रिलायन्स जिओचा बहुचर्चित असलेला आज मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी दाखल झाला आहे. ४ जी फिचर असलेला हा फोन बीटा ट्रायलसाठी बाजारात आल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. गॅजेट ३६० ने दिलेल्या वृत्तानुसार, आता कंपनीने निवडलेल्या ठराविक ग्राहकांना चाचणीसाठी हा फोन देण्यात आला आहे.

सप्टेंबरमध्ये हा फोन बाजारात सामान्य नागरीकांसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र त्याआधी कंपनीला फोनमधील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची चाचणी करायची असल्याने आता तो काही ग्राहकांना देण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. जिओच्या फोनमध्ये असे काही फिचर आहेत जे इतर फोनप्रमाणे सामान्य नाहीत. या फोनमध्ये ४ जी वीओएलटीई सपोर्ट असेल, याशिवाय मल्टीमीडिया अॅप्लिकेशनसाठीही सपोर्ट असेल. बीटा ट्रायलदरम्यान कंपनी या वेगळ्या फिचरची चाचणी घेणार आहे.

जिओच्या फोनमध्ये ४जी नेटवर्क देण्यात आले असून आता केवळ कंपनीचे कर्मचारी हा फोन वापरु शकत आहेत. या फोनची अधिकृत नोंदणी २४ ऑगस्टपासून सुरु होणार असल्याचे कंपनीने याआधीही जाहीर केले आहे. मात्र आपल्या घराजवळ प्री-ऑर्डर बुकींग करण्याची सुविधा असल्यास आपल्याला या फोनसाठी बुकींग करता येणार आहे. विशेष म्हणजे या फोनसाठी आपल्याला जिओच्या रिटेलर आधार कार्डाची एक छायांकित प्रत द्यावी लागणार आहे.