विमान प्रवासात वेगवेगळे आणि अजब अनुभव ही काही नवीन नाही. कधी विमानाच्या छतातून पाणी गळण्याचा प्रकार घडतो, तर कधी विमानातील जागा भरल्याने विमान कर्मचाऱ्यांना उभे राहून प्रवास करण्याची वेळ येते. अशा वेळी मग या गोष्टींना ट्रोल केले जाते. सोशल मिडीयावरही अशा गोष्टींवरील चर्चांना उधाण येते. मात्र, बर्मिंगहॅमवरून विमान प्रवासाला निघालेल्या भारतीय वंशाच्या दोन प्रवाशांना एमिरेट्स कंपनीच्या विमानात एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. काजूची ॲलर्जी असलेल्या दोन भावांना चक्क प्रसाधनगृहात जाऊन बसण्याचा सल्ला देण्यात आला.
शॅनेन (२४) आणि संदीप सहोता (३३) ही दोन भावंडं कौटुंबिक कार्यासाठी बर्मिंगहमवरून सिंगापूरला निघाले होते. त्यावेळी विमानात तळलेले काजू घातलेली चिकन बिर्यानी दिली जात होती. हे पाहून गोंधळून गेलेल्या सहोता भावंडांनी विमानातील क्रूला आपल्या ॲलर्जीबाबत कल्पना दिली आणि त्वरित मदत करण्यास सांगितले. मात्र, तुम्हाला जर काजूची ॲलर्जी आहे, तर तुम्ही तुमची उशी आणि पांघरूण घेऊन प्रसाधनगृहात जाऊन बसा, असा अजब सल्ला त्या दोघांनाही देण्यात आला. अखेर तब्बल ७ तास त्या दोघांनाही विमानाच्या मागील बाजूच्या कोपऱ्यात आपले तोंड आणि नाक झाकून बसावे लागले.
विमानाचे तिकीट आरक्षित करताना, चेक-ईनच्या वेळी आणि विमानात चढतानाही आम्ही आमच्या ॲलर्जीबाबत कल्पना दिली होती, असे सहोता भावंडांचे म्हणणे आहे. परंतु, अशी कोणतीही कल्पना नसल्याचे विमान प्रशासनाने सांगितले. आम्ही आमच्या एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी जात होतो. आम्ही खूप आनंदात होतो. मात्र, या प्रसंगाने आम्ही निराश झालो, अशी खंत शॅनेन सहोता यांनी व्यक्त केली.