हरयाणाच्या मातीत 1952 साली ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या दिवशी(14 फेब्रुवारी) एका मुलीने जन्म घेतला. ही मुलगी एकदिवस केवळ भारतातच नव्हे तर जगभरात नाव कमावेल असा विचार क्वचितच कोणी केला असेल. आम्ही बोलत आहोत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याबाबत. मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

घरातूनच आरएसएसचे धडे –
सुषमा स्वराज यांच्या आई-वडिलांचा संबंध पाकिस्तानच्या लाहोरशी होता. नंतर ते हरयाणाच्या अंबालामध्ये वास्तव्यास आले. पिता हरदेव शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, त्यामुळे संघाच्या पाठशाळेचं ज्ञान त्यांना घरातूनच अगदी लहानपणापासून मिळालं. पंजाब युनिव्हर्सिटीमधून वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर वक्तृत्वगुणांच्या जोरावर त्यांनी हरयाणाच्या लँग्वेज डिपार्टमेंटच्या स्पर्धेत सलग तीन वर्ष सर्वश्रेष्ठ हिंदी वक्ता हा पुरस्कार मिळवला.

कॉलेजमध्ये झाली होती भेट, आणीबाणी दरम्यान केला विवाह –
पंजाब विद्यापिठाच्या अंतर्गत येणाऱ्या चंदीगडमधील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेताना सुषमा यांची पहिल्यांदा स्वराज कौशल यांच्याशी भेट झाली. नंतर त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. यादरम्यान दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यासाठी काम करायला सुषमा स्वराज यांनी सुरूवात केली, स्वराज कौशल हे देखील त्यावेळी त्यांच्यासोबत होते. आणीबाणीच्या काळात सुषमा आणि स्वराज कौशल यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. याचदरम्यान दोघांमधील जवळीक वाढली, आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. राजकारणात दिसणारी सुषमा यांच्यातील धमक त्यांनी खासगी आयुष्यातही दाखवली. ज्या काळात महिलांना पुरेसे स्वातंत्र्य दिले जात नव्हते, हरयाणात तर एखाद्या तरुणीने प्रेमविवाह तर दूरच तसा विचार करणं देखील चुकीचं मानलं जायचं, त्या काळात स्वराज यांनी आई-वडिलांचा विरोध असतानाही प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबीयांचा लग्नाला विरोध असतानाही त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या आणि बऱ्याच प्रयत्नांनी त्यांनी आपल्या घरच्यांची लग्नासाठी समजूत काढून परवानगी मिळवलीच. त्यानंतर अखेर 13 जुलै 1975 रोजी दोघांनी लग्न केले. लग्नानंतर सुषमा यांनी पतीचं आडनाव न लावता फक्त नाव लावण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून त्यांनी स्वराज हे आपलं नवं आडनाव म्हणून लावण्यास सुरूवात केली आणि सुषमा स्वराज या नावाने त्या ओळखल्या जाऊ लागल्या.
कोण आहेत कौशल स्वराज –
सुषमा यांचे पती स्वराज हे सर्वोच्च न्यायलयात प्रतिष्ठित वकील आहेत. स्वराज यांना वयाच्या 34 व्या वर्षी अॅडव्हकेट जनरल पदावर नियुक्त करण्यात आले होते. ते सर्वात कमी वयाचे अॅडव्होकेट जनरल ठरले. तर वयाच्या ३७ व्या वर्षी ते मिझोरमचे राज्यपाल झाले. त्यांनी 1990 ते 1993 या तीन वर्षांसाठी राज्यपाल पद भूषवले.