News Flash

हे कुटुंब खरोखर राहत होतं ‘काळाच्या ४० वर्ष मागे’

मानवी वस्तीपासून २०० मैल, समुद्रसपाटीपासून ६००० फूट वर!

कार्प लायकाॅव्ह आणि त्यांनी पत्नी अकुलिना (सौजन्य- स्मिथसोनियन)

रशियातला सैबेरियाचा प्रदेश जगातल्या सर्वात भीषण हवामान असणाऱ्या प्रदेशांपैकी एक मानला जातो. ५० लाख चौरस किलोमीटर असणारा हा प्रदेश जगातल्या एकूण भूप्रदेशापैकी १० टक्के भाग व्यापतो. वर्षभर इथलं सरासरी तापमान शून्याखाली पाच अंश सेल्सियमवर असतं. १९३३ साली इथलं तापमान शून्याखाली ६७ अंश सेल्सियसपर्यंत उतरलं होतं.

अशा भयानक हवामानामुळे या एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात अतिशय विरळ लोकवस्ती आहे. शेकडो किलोमीटरच्या पट्ट्यात एकही माणूस नाही असं इथे अनेकदा दिसतं.

अशा या सैबेरियाच्या दक्षिण भागात रशियन शास्त्रज्ञांचं एक पथक हेलिकाॅप्टरने आलं. रशियन सरकारने त्यांना तिथल्या जंगलांची पाहणी करायला बोलावलं होतं. इथल्या तैगा प्रदेशात जंगलाच्या दाटीमुळे हेलिकाॅप्टर उतरवायला जागा नव्हती. पण जंगलाच्या एका भागात काही झाडं तोडलेली दिसत होती.

सर्वात जवळच्या मानवी वस्तीपासून २०० मैल दूर असणाऱ्या आणि समुद्रसपाटीपासून ६००० फूट उंचावर असलेल्या या प्रदेशात झाडं तोडली तरी कुणी याचं त्या शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटलं. त्यांनी ते हेलिकाॅप्टर तिथे उतरवलं आणि त्यांना हे एक विचित्र पध्दतीने बांधलेलं खोपट दिसलं.

लायकाॅव्ह कुटुंबाचं 'घर' (सौजन्य : स्मिथसोनियन) लायकाॅव्ह कुटुंबाचं ‘घर’     (सौजन्य : स्मिथसोनियन)

 

काही वेळाने दरवाजासारखी दिसणारी एक फळी बाजूला करत अस्ताव्यस्त दाढी वाढलेला माणूस बाहेर आला. शास्त्रज्ञांनी त्याला रशियन भाषेत काही प्रश्न विचारले. बऱ्याच वेळ त्यांच्याकडे चमत्कारिक नजरेने पाहणारा हा म्हातारा रशियन भाषेत म्हणाला “या माझ्या घरात!”

हे वर्ष होतं १९७८ आणि या म्हाताऱ्याचं नाव होतं कार्प लायकाॅव्ह. त्याने त्याच्या घरात नेत त्याची पत्नी आणि मुलामुलींची ओळख करून दिली. हा म्हातारा जे अस्पष्ट रशियन बोलत होता ते कळत तरी होतं. पण त्याची मुलं विचित्रपणे आवाज काढत एकमेकांशी बोलत होती. मध्येच एखादं वाक्य स्पष्टपणे बोललं जायचं. नंतर तेही नाही.

या कुटुंबाशी संवाद साधल्यावर रशियन शास्त्रज्ञांना जबर धक्का बसला. मानवी वस्तीपासून शेकडो मैल दूर असणाऱ्या या बर्फाळ जंगलात राहायला हे कुटुंब १९३७ साली आलं होतं! म्हणजे जवळपास ४० वर्षांमध्ये या सहा माणसांनी कुठल्या सातव्या माणसाचा चेहराही पाहिला नव्हता! कुठल्याही सोयीसुविधांविना संपूर्ण जगाशी त्यांचा संपर्क तुटला होता. पण त्यांनी या परिस्थितीत स्वत:ला जगवलं होतं.

विचार करा! ज्यावेळी लायकाॅव्ह कुटुंब रशियन शास्त्रज्ञांना १९७८ भेटलं तेव्हा या कुटुंबाला दुसरं महायुध्द होऊन गेलं आहे हे माहीतच नव्हतं, मानवाने अंतराळयान तयार करून चंद्रावर पाऊल ठेवलं याचा त्यांना पत्ता नव्हता. कारण १९३७ नंतर हे कुटुंब जगातल्या कोणालाच भेटलं नव्हतं!

इतकी वर्षं सैबैरियाच्या भयानक हवामानात या कुटुंबाने स्वत:साठी लागणारं अन्न कुठल्याही सुविधेविना स्वत:च पिकवून खाल्लं. जबर थंडीमुळे अनेकदा हे पीक यायचं नाही. तेव्हा हे कुटुंब आसपासच्या प्राण्यांची शिकार करायचं. १९३७ साली आणलेले कपडे आणि बूट झिजत झिजत निकामी झाल्यावर कुठल्याही मूलभूत साधनांशिवाय या कुटुंबातला मोठा मुलगा दिमित्री शिकार करून आणायचा, त्यासाठी तो दोन तीन दिवस बाहेर राहत शून्याखालच्या तापमानात उघड्यावर झोपायचा.

दिमित्री लायकाॅव्ह आणि त्याची बहीण (सौजन्य- स्मिथसोनियन) दिमित्री लायकाॅव्ह आणि त्याची बहीण      (सौजन्य- स्मिथसोनियन)

हे कुटुंब खरोखर मध्ययुगीन जीवन जगत होतं. आपल्याकडे असणाऱ्या काही धार्मिक पुस्तकांच्या आधारे कार्प लायकाॅव्हच्या बायकोने त्यांच्या मुलांना थोडंफार लिहायला वाचायला शिकवलं. पण कोणाशीही बोलायला न मिळाल्याने या मुलांची भाषा वेगळ्या पध्दतीने विकसित झाली होती. त्यांना एकमेकांशी संवाद साधायला अडचण येत नव्हती पण रशियन शास्त्रज्ञांना त्यांच्याशी बोलणं खूप कठीण पडलं.

या शास्त्रज्ञांकडे असणाऱ्या साध्यासाध्या गोष्टी लायकाॅव्ह कुटुंबीयांना आश्चर्यचकित करणाऱ्या होत्या. प्लॅस्टिकच्या पिशव्यांकडे पाहून कार्प लायकाॅव्ह म्हणाला “काय काय गोष्टी निघाल्या आहेत आता. ही काच आहे पण ती वाकतेसुध्दा!”

असं जरी असलं तरी या कुटुंबाने ४० वर्षात जबरदस्त अडीअडचणींचा सामना करत स्वत:ला तगवलं होतं. इतकी वर्षं एवढ्या भयाण वातावरणात राहून जगलेलं हे कुटुंब म्हणजे माणसाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचं उदाहरण आहे.

कार्प आणि अकुलिना यांची मुलगी अगाफिया हीच त्यांच्या कुटुंबातली अजून हयात असणारी व्यक्ती आहे. २०१३ साली ‘वाईस’ या वृत्तवाहिनीने तिच्यावर एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ पाहणं म्हणजे मानवाच्या कल्पनातीत सामर्थ्याला सलाम करणंच आहे!

सौजन्य- वाईस. यूट्यूब

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 10:30 am

Web Title: this family stayed in isolation in freezing siberia for four decades
Next Stories
1 न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांनी शोधला नवा खंड… ‘झीलँडिया’
2 ‘हा’ अपंग बाॅयफ्रेंड आणि त्याच्या गर्लफ्रेंडविषयी आणखी थोडंसं…
3 ‘रेल्वे केटरिंग घोटाळ्या’ची पोस्ट फेसबुकवर व्हायरल
Just Now!
X