एकीकडे सध्याच्या महामारीच्या काळात आर्थिक मंदी, सहाय्यता निधीचं संकट आणि नोकरीतील घट यासंबंधीच्या बातम्या मोठ्या प्रमाणात येताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे राजस्थानमधील चित्तौडगढ जिल्ह्याजवळ असलेल्या सांवलीया सेठ मंदिरात चक्क अमेरिकन डॉलर, अगणित संपत्ती, सोन्याची बिस्किटं आणि दागदागिन्यांचा अक्षरशः पाऊस पडतोय. पौराणिक कथेनुसार या मंदिरात श्रीकृष्ण भक्त मीराबाई श्रीकृष्णाची पूजा करायची. इथले काही भक्त हे आपल्या पगारात तर काही भक्त हे आपल्या व्यवसायात देवाला बिझनेस पार्टनर बनवतात. हे सारं वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. पण हे खरंय.

राजस्थानमधील चित्तौडगढ ते उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर 28 किमी अंतरावरील भातसोडा गावात हे सांतोलिया सेठ मंदिर वसलेलं आहे. चित्तौडगढ रेल्वे स्टेशनपासून ४१ किमी आणि दाबोक विमानतळापासून ६५ किमी अंतरावर हे मंदिर आहे. हे सुप्रसिद्ध सांवलीया सेठ मंदिर दरवर्षी लाखो भाविकांना आपल्या भव्यतेमुळे आणि विशेषतेमुळे आकर्षित करत असते. हे मंदिर महाराजा मानसिंग प्रथम यांची पत्नी महाराणी कनकवती यांनी त्यांचा मुलगा जगतसिंह यांच्या स्मरणार्थ बांधलं होतं. एरव्ही श्रीकृष्णासोबत राधाचं नाव जोडलं जातं. पण या मंदिरात मात्र, श्रीकृष्णासोबत त्याची भक्त मीराबाईची पूजा केली जाते.

कालांतराने सांवलीया सेठ मंदिराचा महिमा इतका पसरला की त्याचे भक्त आपल्या पगारापासून ते व्यवसायापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपला भागीदार बनवतात. या मंदिराच्या तिजोरीत भक्त जे देतात त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक भाविकांना सांवलीया सेठ परत देतात, असं म्हटलं जातं. व्यावसायिक जगतात या मंदिराची कीर्ती इतकी आहे की लोक चक्क आपला व्यवसाय वाढवण्यासाठी इथल्या देवालाच त्यांचा व्यवसाय भागीदार बनवतात.

प्रत्येक महिन्याला कृष्ण पक्ष चतुर्दशीला अमावास्येच्या एक दिवस आधी या मंदिराचे दान पत्रक उघड केलं जातं. या पत्रकात देणगीची अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाते. सुमारे 200 सदस्यांचा समावेश असलेली मंदिराची टीम बसून मंदिरात असलेल्या संपत्तीची गणना करत असते, असं मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आणखी वाचा : हत्तीने गणपती मंदिरात येऊन बाप्पाची पूजा केली! व्हिडीओ होतोय व्हायरल

यंदाच्या कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी या सांवलीयाजी मंदिरातील दानपेटी उघडल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार या मंदिरात १ किलो सोन्याची बिस्किटे, सोन्या-चांदीचे दागिने आणि ५.४८ कोटी रुपयांहून अधिक रक्कम दानपेटीत मिळाली आहे. तसंच पहिल्यांदाच १०० अमेरिकन डॉलर्सच्या १२५ नोटा सापडल्या आहेत, असं मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी पुढे बोलताना सांगितलं.

श्री सांवरिया सेठवर भक्तांची खूप श्रद्धा आहे. अगदी दुरून लोक या मंदिरात श्री सांवरिया सेठच्या दर्शनासाठी येत असतात आणि प्रार्थना करतात, असं मंदिर ट्रस्टचे प्रशासन अधिकारी कैलाश धाडीच यांनी सांगितलं.

श्री सांवलीयाजी मंदिर मंडळाचे अध्यक्ष कन्हैयादास वैष्णव म्हणाले की, ” मंदिराच्या दानपेटीत यापूर्वीही डॉलर चलनाची देणगी सापडली होती, पण ही संख्या मर्यादित होती. यावेळी आम्हाला सोन्याच्या बिस्किटांसह १२५ डॉलरच्या नोटा सापडल्या आहेत.” या मंदिराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देणगीची मोजणी अजूनही सुरूच आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत ७२.७१ लाख रुपये रोख आणि मनी ऑर्डर देखील गोळा केले आहेत, असेही ते म्हणाले.

आणखी वाचा : ५० हजारांच्या पाणीपुऱ्या आणि त्याही मोफत… कारण वाचून तुम्हालाही वाटेल कौतुक

आणखी वाचा : लाडक्या गणरायासमोर एसीपीही बेभान होऊन नाचतात तेव्हा…; व्हिडीओ व्हायरल!
या मंदिर देवस्थानाचे विभाग राजस्थान सरकारच्या अखत्यारीत आहे. सांवलीया सेठ यांना राजस्थान आणि मध्य प्रदेशात अफूची लागवड करणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये खूप मान्यता आहे.

यापुढे बोलताना प्रशासन अधिकारी कैलाश धाडीच म्हणाले की, “महामारीच्या काळातही लोकांकडून देणगीचा प्रवाह सुरूच आहे. मंदिर बंद असतानाही लोकांचा विश्वास कमी झाला नाही. भक्त आपली इच्छा पूर्ण झाल्यावर दान करण्यासाठी महामारीच्या काळातही खुल्या मनाने येत आहेत. उलट सध्याच्या कठीण काळामध्ये भक्तांचा विश्वास आणखी दृढ होत चालला आहे.”

गेल्या वर्षी तीन महिन्यांच्या लॉकडाउननंतर मंदिर उघडल्यानंतरही केवळ १० दिवसात ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त साठा राखीव ठेवण्यात आला होता, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

या मंदिरात दर्शनासाठी परदेशी पर्यटकांचाही ओघ असतो. सध्या करोनामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे. तथापि, देणग्यांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. महामारीच्या काळातही मोठ्या प्रमाणात पैसे, सोन्या-चांदीचे दागिने सांवलीया सेठ यांना दान केले जात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.