आपल्यापैकी प्रत्येकाने शालेय जिवनामध्ये हस्ताक्षर स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल. अनेक शाळांमध्ये ही स्पर्धा सक्तीची असल्याने सर्वच मुलांना एक पानभर तरी आपल्या हस्ताक्षराचे प्रदर्शन मांडावे लागते. या स्पर्धेची अचानक आठवण होण्याचं कारण म्हणजे सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असलेली एक पोस्ट.

काय आहे या पोस्टमध्ये?

व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये अहमदनगरमधील एका जिल्हा परिषद शाळेतील मुलीने लिहिलेला परिच्छेद दिसत आहे. या मुलीचे अक्षर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अगदी कॅलिग्राफी केल्याप्रमाणे या मुलीचे अक्षर असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

कोण आहे ही मुलगी?

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सोनगावमधील कडूवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थीनीचे हे हस्ताक्षर आहे. हस्ताक्षर स्पर्धेत बालगटामध्ये सहभागी झालेली ही मुलगी तिसऱ्या इयत्तेत शिकत असून तिचे नाव श्रेया गोरक्षनाथ सजन असे आहे. मनसे वृत्तांत अधिकृत या व्हेरिफाइड फेसबुक पेजवरुनही श्रेयाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

मनसेच्या फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ दहा हजारहून अधिक जणांनी शेअर केला आहे.