पाकिस्तानच्या लाहोर युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये एका तरुणीने तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलाला खुलेआम प्रपोज केल्यामुळे वाद निर्माण झालाय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच युनिव्हर्सिटी प्रशासनाने तरुण आणि तरुणी दोघांचीही कॉलेजमधून हकालपट्टी केली आहे. गैरवर्तन केल्याचा आणि विद्यापीठाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

लाहोर युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये गेल्या गुरूवारी ही घटना घडली. तेव्हापासून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एक तरुणी गुडघ्यावर बसून तरुणाला प्रपोज करताना दिसते. हातात लाल गुलाबांचा पुष्पगुच्छ घेऊन ही तरुणी प्रपोज करत असताना तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होते. त्यानंतर तरुणाने तिच्या प्रेमाचा स्वीकार करताच टाळ्यांचा गडगडाट होतो. एखाद्या सिनेमातील दृष्याप्रमाणे या घटनेचा व्हिडिओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला. विद्यापीठ प्रशासनापर्यंत हा व्हिडिओ पोहोचल्यानंतर मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

गैरवर्तन केल्याचा आणि विद्यापीठाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर विद्यापीठाच्या शिस्तपालन समितीने ठेवलाय. शिस्तपालन समितीने दोन्ही विद्यार्थ्यांना याबाबत विचारणा करण्यासाठी समन्स पाठवले होते, पण दोघेही हजर राहिले नाहीत. अखेर त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढून टाकल्यामुळे ट्विटरवर मात्र अनेक नेटकरी राग व्यक्त करत आहेत. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची मुलगी बख्तावर भुट्टो-झरदारी यांनीही विद्यापीठाच्या कारवाईवर टीका करताना हा थिल्लरपणा असल्याची प्रतिक्रिया ट्विटरद्वारे दिली आहे.


दरम्यान, गेल्या गुरूवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.