इस्रो ब्यालालु येथील ३२ मीटर अँटेनाचा वापर करुन विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. ब्यालालु हे बंगळुरु जवळ असलेले इस्रोचे डीप स्पेस नेटवर्क सेंटर आहे. आतापर्यंत केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. जेपीएलच्या ७० मीटर अँटेनाच्या सहाय्याने सुद्धा विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेपीएल ही नासाशी संबंधित असलेली प्रयोगशाळा आहे. पण विक्रमकडून अजून कुठलाही सिग्नल मिळालेला नाही.

आमचा जेपीएल बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे. विक्रम बरोबर संपर्क साधण्यासाठी आम्ही त्याचा पुरेपूर वापर करत आहोत असे इस्रोच्या एका वैज्ञानिकाने सांगितले. इस्रोच्या नियंत्रण कक्षातून विक्रमला कमांड दिल्या जात आहेत. पण विक्रमकडून अजून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. इस्रोकडे फक्त २१ सप्टेंबरपर्यंतचा वेळ आहे. कारण त्यानंतर विक्रमला सूर्यप्रकाश मिळणार नाही.

पृथ्वीवरचे चौदा दिवस म्हणजे चंद्रावरचा एक दिवस असतो. २१ सप्टेंबरनंतर चंद्रावर रात्र सुरु होईल. लँडर आणि रोव्हरची रचना १४ दिवसांच्या दृष्टीने करण्यात आली होती. विक्रमवर बसवलेला अँटेना आणि ट्रान्सपाँडरची स्थिती नेमकी कशी आहे ते ही अजून समजू शकलेले नाही. कुठला संपर्क प्रस्थापित झाला तर अँटेना योग्य दिशेला असणे आवश्यक आहे. लँडरचा फोटो मिळाला असला तरी त्याच्या स्थितीबद्दल इस्रोने अद्यापर्यंत अधिकृत माहिती दिलेली नाही

भविष्यातील मोहिमांकडे लक्ष केंद्रीत करा
इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी संस्थेच्या शास्त्रज्ञांना भविष्यातील मोहिमांकडे लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. मागच्या आठवडयात विक्रम लँडरचं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यामध्ये इस्रोला अपयश आलं. या अपयशाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर सिवन यांनी शास्त्रज्ञांना भविष्यातील मोहिमांवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी सिवन यांनी इस्रोमधील शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्सना मार्गदर्शन केले. चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २.१ किमी अंतरावर असताना विक्रम लँडर मार्गावरुन भरकटला आणि हार्ड लँडिंग झाले. नेमकं त्यावेळी चंद्रावर काय घडलं? कशामुळे अपयश आलं? त्याचे इस्रोकडून अंतर्गत विश्लेषण सुरु आहे.