पृथ्वीतलावरील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाणी. पाण्यावाचून जगणं अशक्य आहे. पाण्याचं हे महत्व माहित असूनही अनेक वेळा आपल्याकडून पाण्याचा अपव्यय होतो. आजकाल प्रत्येकाच्या घरात २४ तास पाणी पाहायला मिळतं. त्यामुळे प्रत्येक जण पाण्याचं महत्व विसरु लागला आहे. मात्र आजही देशात अशी काही गावं आहेत, जेथे रोज केवळ एक हंडा पाणी मिळवण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते. या साऱ्यावर मात करण्यासाठी अनेक वेळा विविध उपक्रमांच्या माध्यमातून पाणी वाचवण्याचे संदेश दिले जातात. मात्र आपणदेखील पाण्याचं महत्व समजून पाणी वाचवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचं आहे. त्यातच एका माकडानेदेखील पाणी वाचविण्याचा संदेश दिला आहे. सध्या या माकडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तहानेने व्याकूळ झालेलं एक माकड नळावर पाणी पित आहे. विशेष म्हणजे पाणी पिऊन झाल्यानंतर या माकडाने चक्क नळ बंद केला आणि पाण्याचा अपव्यय टाळला.

या माकडाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली असून अनेकांनी या माकडाचं कौतूक केलं आहे. त्यासोबतच अनेकांनी ‘या माकडाकडून काही तरी शिका’, असंही म्हटलं आहे. तर ‘प्राण्यांना देखील अक्कल आहे, मात्र मानवाकडे नाही. त्यांच्याकडून पाणी कसं वाचवायचं ते शिका’, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.