लॉर्ड्सच्या मैदानावर रंगलेल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत विलक्षण उत्कंठावर्धक ठरलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर मात केली. यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला इंग्लंडच्या रुपाने नवीन विश्वविजेता मिळाला. पण तो कोणता क्षण होता ज्यामुळे न्यूझीलंड संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं? सुपर ओव्हरमध्ये 16 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 2 धावा आवश्यक होत्या. मार्टिन गप्टिलने चेंडू टोलावला पण केवळ एकच धाव ते धावू शकले आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात गप्टील धावबाद झाला.

गप्टील बाद होताच किवींचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं. पहिल्या उपांत्य सामन्यात महेंद्र सिंह धोनी ज्याप्रकारे बाद झाला त्याचप्रकारे गप्टील धावबाद झाला. धोनी धावबाद होताच भारताचा पराभव निश्चीत झाला होता. विशेष म्हणजे गप्टीलनेच धोनीला धावबाद केलं होतं. फरक एवढाच होता की गप्टीलने थेट फेकीवर धोनीला बाद केलं होतं. अखेरच्या सामन्यात गप्टील स्वतः देखील त्याचप्रकारे बाद झाला आणि अनेक क्रिकेट चाहत्यांनी ट्विटरवर ‘करावं तसं भरावं’ अशा आशयाचे ट्विट्स करत गप्टीलला ट्रोल करायला सुरूवात केली. धोनीला धावबाद केल्याचा राग भारतीय चाहत्यांच्या मनात असल्यानेच गप्टीलला अशाप्रकारच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं.


दरम्यान, 2015 च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा हाच मार्टीन गप्टील यंदाच्या संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत सपशेल अपयशी ठरला आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पहिला सामना श्रीलंकेशी झाला. या सामन्यात गप्टीलने 73 धावांची खेळी केली. परंतु त्यानंतरच्या एकाही सामन्यात गप्टीलला त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी करता आली नाही.