सध्याच्या काळातील लोकप्रिय संवाद माध्यम असणाऱ्या व्हॉटस अॅपवर लवकरच एक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता उद्योगांच्या नावे असणाऱ्या व्हॉटस अॅप अकाऊंटच्या विश्वासर्हतेची खात्री पटवता येणे शक्य होईल. उद्योगांच्या नावे असलेल्या या व्हॉटस अॅप अकाऊंटपुढे हिरव्या रंगाची टीक असेल. जेणेकरून हे अकाऊंट संबंधित उद्योग संस्था किंवा समूहाचे अधिकृत अकाऊंट आहे, हे ओळखता येईल. फेसबुक आणि ट्विटरवर यापूर्वीच ही सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. लवकरच युजर्सना ही सुविधा वापरता येईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.

व्हॉटसअॅपची ‘ही’ नवीन फीचर्स माहितीयेत?

व्हॉटस अॅप उद्योगांसाठी संवादाचे काही नवीन पर्याय उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी व्हॉटस अॅप काही बिझनेस अकाऊंटस व्हेरिफाईड करेल. त्यामुळे तुम्हाला एखाद्या नावासमोर हिरव्या रंगाची टीक दिसत असेल तर व्हॉटस अॅपने या मोबाईल नंबरची खातरजमा केली असून ते संबंधित उद्योगाचे अधिकृत अकाऊंट आहे, असे समजावे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हे फिचर वापरण्यात येणार असून त्यासाठी मोजक्या कंपन्यांनाच व्हेरिफाईड करण्यात येईल. अकाऊंट व्हेरिफाईड झाले आहे किंवा नाही, हे कसे जाणून घेता येईल, याची माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तुम्ही चॅट करताना मेसेजेस पिवळ्या रंगात दिसत असतील तर ते व्हेरिफाईड बिझनेस अकाऊंट असेल. तसेच संबंधित व्हेरिफाईड युजरला दुसऱ्या व्हेरिफाईड अकाऊंटशी केलेले चॅट डिलिट करता येणार नाहीत. युजरने ज्या नावाने नंबर सेव्ह केला आहे, त्याच नावाने व्हेरिफाईड अकाऊंट दिसेल. ‘व्हॉटस अॅप बेटा’चे २.१७.२८५ हे व्हर्जन अपडेट झाल्यानंतर युजर्सना या सुविधेचा उपयोग करता येईल.