काही प्रश्नांची उत्तरं ही त्या प्रश्नातच दडली असतात, फक्त थोडा स्मार्टनेस दाखवला की उत्तर शोधणं सोपं जातं. आता हे ‘तत्वज्ञान’ ऐकवण्याचं कारण म्हणजे Who Wants To Be A Millionaire? कार्यक्रमामध्ये घडलेला एक गंमतीशीर किस्सा होय. आपल्याकडे प्रसिद्ध असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’चं हे तुर्किश व्हर्जन. त्यामुळे तिथेही हा कार्यक्रम आपल्या इतकाच प्रसिद्ध आहे. पण या कार्यक्रमाच्या पहिल्याच टप्प्यात विचारण्यात आलेल्या सोप्या प्रश्नाचं उत्तर एका महिला स्पर्धकाला देता आलं नाही, प्रश्नातच उत्तर दडलं असताना तिनं दोन लाईफ लाईन वाया घालवल्या त्यामुळे तिची सर्वाधिक चर्चा होत आहे.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सू आयहान या २६ वर्षीय तरुणीला ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ कुठे आहे असा प्रश्न विचारला होता. यासाठी तिला चीन, भारत, दक्षिण कोरिया आणि जपान असे चार पर्याय देण्यात आले होते. मात्र तिला उत्तर सापडेना. शेवटी तिनं जनतेचा कौल घेण्याचं ठरवलं. ५१% लोकांनी ही जागा चीनमध्ये असल्याचं म्हटलं तर ४९% टक्के लोकांना ही जागा भारतात असावी असा विश्वास होता. चीन आणि भारत अशा दोन पर्यायामुळे संभ्रमात असलेल्या आयहाननं ‘फोनो फ्रेंड’चा पर्याय निवडला. अखेर तिच्या मित्रानं याचं अचूक उत्तर दिलं. या लाजिरवाण्या प्रसंगातून तर ती बाहेर पडली मात्र दुसऱ्या प्रश्नांचं चूकीचं उत्तर दिल्यानं ती या स्पर्धेतून बाहेर पडली.