कोणाच्या नशीबाचं द्वार कधी उघडेल काही सांगता येत नाही. आता हेच बघाना कोणेएके काळी चुकून खरेदी केलेल्या लॉटरीच्या तिकिटामुळे मॅनहॅटनमधली ओक्साना झाहारोव्ह ही महिला रातोरात कोट्यधीश झाली.

काही दिवसांपूर्वी ओक्सानाने एका दुकानदाराकडे १ डॉलर किमतीचं लॉटरीचं तिकीट मागितलं होतं. पण, दुकानदारानं तिला चुकून १० डॉलर किमतीचं लॉटरीचं तिकिट दिलं. दुकानदाराला चुक लक्षात आल्यावर त्याने तिच्या निदर्शनासही आणून दिले. पण, ओक्सानानं ते तिकीट परत न करता स्वत:जवळ ठेवलं आणि वरचे नऊ डॉलर दुकानदाराला दिले. हे लॉटरीचे तिकीट काही आपल्याला लागणार नाही असाच तिचा समज होता. म्हणून तिनं या तिकिटाचा चक्क बुकमार्क म्हणून वापर केला. दोन आठवडे तिच्याजवळ बुकमार्क म्हणून हे तिकीट पडून होतं. शेवटी तिने जेव्हा तिकिटावरचा नंबर खोडून पाहिला तेव्हा तिच्या आनंदाला पारावर उरला नाही कारण चुकून खरेदी केलेल्या या लॉटरीच्या तिकिटामुळे तिने जवळपास ३१ कोटी ७२ लाख डॉलर जिंकले होते.

आपण इतकी रक्कम जिंकू याची तिने कल्पनाही केली नव्हती. मिळालेल्या बक्षिसातून ती तिच्या कुटुंबासोबत काही दिवस सहलीसाठी जाणार आहे तर उर्वरित रक्कम आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणार असल्याचेही तिने सांगितले.