लॉर्ड्सच्या मैदानावर रंगलेल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत विलक्षण उत्कंठावर्धक ठरलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर मात केली. सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय प्राप्त करत विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडला विश्वविजयाचा मान मिळाला आहे तर न्यूझीलंडला वर्ल्डकप स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. या रंजक सामन्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून काही मीम्स व्हायरल झाले आहेत.

विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात महेंद्र सिंह धोनी ज्याप्रकारे बाद झाला त्याचप्रकारे अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा गप्टील धावबाद झाला. त्यामुळे न्यूझीलंड संघाची ‘जैसी करनी वैसी भरनी, ये तो सच है की भगवान है, पता है तुम लोग मॅच क्यों हारे’ असे म्हणत नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. हे मीम्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २४२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करत इंग्लंडला २४१ धावांवर रोखले. सामना टाय झाल्याने वर्ल्डकप फायनलमध्ये पहिल्यांदाच सुपर ओव्हर खेळविण्यात आली. इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये १५ धावा केल्या. न्यूझीलंडनेही सुपर ओव्हरमध्ये १५ धावा केल्या. त्यामुळे आयसीसीच्या नियमांनुसार अखेर इंग्लंडला सर्वाधिक चौकार मारल्याच्या मुद्द्यावर विजयी घोषित करण्यात आले.