Ayodhya Ram Lalla’s Mukut Close Look: अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरातील ऐतिहासिक प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला, राम लल्ला यांच्यासाठी सुरत मधून ११ कोटी रुपयांच्या रत्नजडित सुवर्ण मुकुट पाठवण्यात आला होता. भक्ती आणि सूक्ष्म कारागिरीचे प्रतीक असलेली ही भेट ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे प्रसिद्ध ज्वेलर मुकेश पटेल यांच्याकडून पाठवण्यात आली होती. पटेल सांगतात की, “ज्या क्षणी मी प्रभू रामासाठी अलंकार अर्पण करण्याच्या शक्यतेबद्दल विचार केला तेव्हाच माझे डोळे भरून आले होते आणि माझ्या डोक्यात इतकंच होतं की जे काही असेल ते नेत्रदीपक असायला हवं कारण राजांचा राजा राम लल्लाच्या माथ्यावर ते विराजमान होणार आहे.”
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश नवदिया यांनी पटेल यांना राम मूर्तीसाठी अलंकार घडवण्यास सुचवले होते आणि त्यांच्या या विनंतीने भारावून गेलेल्या पटेल व कुटुंबांनी लगेच होकार देऊन या अद्वितीय अलंकाराची जडणघडण करायला सुरुवात केली.
रामल्लासाठी मुकुट कसा तयार झाला?
पटेल यांनी सांगितले की, “आमच्या दोन कुशल कारागिरांना मूर्तीचे मस्तक अचूक मोजण्यासाठी अयोध्येला नेण्यात आले. ते सुरतला परतले आणि त्यांनी ताबडतोब मुकुट तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली, त्यांच्या कामात समर्पणाचा भाव दिसून येत होता. त्यामुळे या मुकुटाची अंतिम झलक ही केवळ बघण्यासारखी नाही तर बघतच राहावं इतकी सुंदर झाली आहे. तब्बल ११ कोटी रुपयांचा, ६ किलो वजनाचा, ४. ५ किलो शुद्ध सोन्याचा हा मुकुट आहे एकमेवाद्वितीय आहे. यामध्ये अगदी बारीक फुलांची कलाकुसर करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे हिरे, रंगीत माणिके, मोती, नीलम सारखी अनेक सुंदर रत्ने जडवण्यात आली आहेत. प्रत्येक रत्नाचे तेज प्रभू श्रीरामाच्या तेजाला साजेसे असेल अशा प्रकारे मुकुटात योग्य ठिकाणी जोडलेले आहेत.
हे ही वाचा << मोदींनी राम मंदिर बांधणाऱ्या कामगारांचा केला मोठा गौरव; हातात परडी घेऊन गेले अन्..पाहा खास Video
नवदिया यांनी सांगितल्याप्रमाणे, मुकुटाची डिझाईन ही यापूर्वी अनेक राजांनी परिधान केलेल्या पारंपरिक मुकुटांप्रमाणेच आहेत. मुकुटाच्या वरील भागात कमळाचे बारीक कोरीवकाम आहे, परंपरेक मंदिर वास्तुकला, रामाचे राज्य व देवत्व या तिन्ही पैलूंचे प्रतिक असा हा मुकुट साकारण्यात आला आहे. ते पुढे म्हणतात की, “हा फक्त एक मुकुट नसून भारतातली रामभक्तांची रामाप्रती असलेली श्रद्धा, अढळ विश्वास व अतूट भक्ती याचा पुरावा आहे. यात लाखोंची स्वप्ने, आशा एकत्रित जोडलेल्या आहेत.”