भारताच्या अनेक खेड्यात आजही शौचालय नाहीत. जिथे घरात शौचालय नाहीत तिथे शाळांची अवस्था काय असणार म्हणा. तामिळनाडूमधल्या कुरुंबापत्ती गावातील शाळकरी मुलांनाही अशाच समस्येचा सामना करावा लागत होता. शाळेत योग्य असे शौचालय नाहीत. तेव्हा विद्यार्थ्यांना उघड्यावरच लघुशंकेसाठी जावे लागायचे. पण याचबरोबर अनेक समस्या देखील त्यांना येत होत्या. तेव्हा शाळेतील १३ वर्षांच्या चार मुलांनी मिळून आपल्या शाळेत आधुनिक प्रकारचे शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. पण गावाकडच्या ठिकाणी शौचालयात युरीन कमोड बसवण्याएवढे पैसे या चौघांकडेही नव्हते. तेव्हा या मुलांनी शक्कल लढवत टाकाऊ वस्तूंपासून अत्यंत उपयुक्त असे शौचालय तयार केले आहे.
सुपिक पंडिअन, संतोष, धियनिथी, रगुल, प्रभाहरन या शाळेत शिकणाऱ्या मुलांनी शाळेत योग्य शौचालय बांधण्याचा उपक्रम हाती घेतला. शौचालयाच्या अभावी या मुलांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. पण शाळेत लघुशंकेसाठी युरीन कमोड उभारणं शक्य नव्हतं तेव्हा या मुलांनी प्लॅस्टिकच्या २० लिटरच्या बाटल्या वापरून त्यापासून युरीन कमोड बनवले. यासाठी त्यांच्या एका शिक्षकांनी देखील मुलांना मदत केली. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांनी या उपक्रमासाठी निधी गोळा केला. या मुलांनी पाईप आणि रंगकामाचे इतर सामान जमवून शाळेत अखेर आधुनिक पद्धतीचे शौचालय बांधून दाखवलेच.
त्यांच्या या कल्पनेपासून अनेकजण खूश झाले आहेत आणि या मुलांवर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे. कुरुंबापत्ती ग्राम विकास शाळेचे हे विद्यार्थी आहेत. या मुलांना त्यांच्या कल्पनेसाठी ‘ I CAN २०१६’ या पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. या पुरस्कासाठी देशभरातील ३ ६०० मुलांनी राबवलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचा विचार करण्यात आला होता. त्यापैकी या विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देण्यात आला.